Mohammed Shami : ‘माझ्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत,’ असं शमी बीसीसीआयला का विचारतोय?

Mohammed Shami : नवीन पॉडकास्टमध्ये शमीने आपल्या मनातील एक सल बोलून दाखवली आहे. 

110
Mohammed Shami : ‘माझ्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत,’ असं शमी बीसीसीआयला का विचारतोय?
  • ऋजुता लुकतुके

जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी हे दोन भारतीय संघाचे आघाडीचे तेज गोलंदाज आहेत. दोघांनीही जागतिक पातळीवर आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. मोहम्मद शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला होता. एकूण १०० एकदिवसीय सामन्यांत त्याने १९५ बळी घेतले आहेत. पण, त्याचवेळी त्याच्या मनात बीसीसीआय आणि संघ प्रशासनाबद्दल अढी आहे. (Mohammed Shami)

नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्याने ती बोलून दाखवली. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याच्या नावावर १८ सामन्यांत ५५ बळी आहेत. आयसीसी स्पर्धेत तो सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. ‘आता बीसीसीआयला माझ्याकडून आणखी काय अपेक्षा होती,’ असा सवाल तो करतो आहे. (Mohammed Shami)

ही सल २०१९ च्या विश्वचषकापासून त्याच्यात दडलीय. ‘२०१९ च्या विश्वचषकात पहिले ४-५ सामने मी खेळलो नाही. संधी मिळाली तेव्हा पहिल्याच सामन्यात मी हॅट ट्रीक घेतली. तर पुढच्या सामन्यात ५ बळी घेतले. मग आणखी चार बळी घेतले. तसंच पुन्हा २०२३ मध्ये घडलं. पहिले दोन सामने मी खेळलो नव्हतो आणि मग मी सातत्याने बळी मिळवले,’ असं विश्वचषकाच्या आठवणी जागवताना शामी अनप्लग्ड या पॉडकास्टमध्ये म्हणाला. (Mohammed Shami)

(हेही वाचा – Kanwar Yatra : जर मुसलमानांचा हलालसाठी आग्रह; तर कावड यात्रेकरूंचा हिंदू विक्रेत्यांचा आग्रह चुकीचा कसा?)

शमीला सतावते ही सल 

२०२३ च्या विश्वचषकात तर फक्त ७ सामन्यांमध्ये २४ बळी मिळवत तो क्रमांक एकचा गोलंदाज ठरला होता. पण, त्याचा संघात समावेश झाला तो हार्दिकला दुखापत झाल्यावर. तोपर्यंत तो अंतिम अकरामध्ये बसत नव्हता आणि हीच त्याची सल आहे. ‘मला एक कळत नाही, संघाला नेहमी बळी मिळवणारे गोलंदाज हवे असतात. मी ही ३ सामन्यांत १३ बळी मिळवले होते. मग माझ्याकडून आणखी काय अपेक्षा होती?’ असं शामी विचारताना दिसतो. म्हणजेच बुमराच्या बरोबरीने मुख्य गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं नाही, याची सल त्याला आहे. (Mohammed Shami)

२०१९ मध्ये सुरुवातीला संधी मिळाल्यावर चांगली कामगिरी केलेली असताना त्याला श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या टप्प्यातील सामन्यात बसवण्यात आलं. ती कटू आठवण शमी मनात बाळगून आहे. ‘मी प्रश्न विचारू शकत नाही आणि माझ्याकडे उत्तरंही नाहीत. मला संधी मिळाली की, मी कामगिरी करून दाखवू शकतो,’ असं शेवटी शमी म्हणतो. सध्या मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीतून सावरत आहे आणि त्याच्या वयामुळे निवडक स्पर्धांमध्ये त्याला खेळवण्याची संघाची रणनीती आहे. (Mohammed Shami)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.