समग्र शिक्षातंर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक अशा जवळपास १ हजारांहून अधिक शाळांमधील सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत कराटे, किक बॉक्सिंग, बॉक्सिंग या स्व-संरक्षण व जीवन कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याच्या माध्यमातून त्यांना आत्मसंरक्षणाचे धडे मिळणार आहेत.
राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणातंर्गत सहावी ते बारावीत शिकणाऱ्या राज्यातील २० हजार २५९ उच्च प्राथमिक शाळा व १ हजार २७९ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थिनींना गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. आधुनिक युगात विद्यार्थिनी पूर्णपणे सुरक्षित नाहीत. त्यामुळे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज झाली आहे. असे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर. खरात यांनी सांगितले. याबाबतचे आदेश ३ फेब्रुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
तायक्वाँदो, कराटे, ज्युदो, वेस्टर्न बॉक्सिंग
समग्र शिक्षातंर्गत विद्यार्थिनीसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत स्व-संरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात तायक्वाँदो, कराटे, ज्युदो, वेस्टर्न बॉक्सिंग, भारतीय मार्शल आर्ट इत्यादी स्व-संरक्षण विशिष्ट कौशल्य प्रशिक्षणाचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींना सेवा पुरवठादाराकडून त्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community