मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचे नाव!

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात याच स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक संयुक्त कार्यक्रम झाला होता.

अहमदाबादच्या मोटेरा येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या या स्टेडियमच्या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यामुळे मोटेरा येथील क्रिकेट स्टेडियम आता यापुढे नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणून ओळखले जाणार आहे.

राष्ट्रपतींकडून उद्घाटन

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे उपस्थित होते. आजपासून सुरू होणारा भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना याच मैदानावर खेळवला जाणार आहे. ही डे-नाईट टेस्ट असून भारतात खेळवला जाणारा ही दुसरीच डे-नाईट कसोटी असणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी आणि अंतिम टेस्ट मॅच देखील याच मैदानात होणार आहे. तसंच त्यानंतर पाच टी-२० मॅचची सीरिज देखील याच ठिकाणी होणार आहे.

(हेही वाचाः प्रिती झिंटाच्या संघात खेळणार शाहरुख खान… असे आहेत आयपीएल- २०२१चे संघ!)

सरदार पटेल स्पोर्ट्स कॉम्लेक्सचे उद्घाटन

या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की आजचा दिवस हा क्रीडा जगतातील सुवर्ण दिवस आहे. आज भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते भारतरत्न सरदार पटेल यांच्या नावे मोठ्या स्पोर्ट्स कॉम्लेक्सचं भूमीपूजन करण्यात आलं आहे. सरदार पटेल स्पोर्ट्स कॉम्लेक्समध्ये जगातील सर्व खेळांची व्यवस्था असणार आहे. देशातील आणि जगातील सर्व खेळाडूंचं ट्रेनिंग आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे. याठिकाणी ३ हजार मुलांची एकाचवेळी खेळण्याची आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं.

या सोहळ्यावेळी शंभरावा कसोटी सामना खेळत असणारा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावतीने सन्मानित करण्यात आले.

असं आहे स्टेडियम

मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असून ७०० कोटींहून अधिक खर्च या स्टेडियमसाठी करण्यात आला आहे. या स्टेडियमची १ लाख १० हजार आसनक्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्‍या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात ७६ कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे. मोटेरा स्टेडियमच्या लाईट्सही खूप वेगळ्या आहेत. फ्लड लाइट्स ऐवजी एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत ज्या सौर उर्जेवर चालतात. याशिवाय स्टेडियममध्ये थ्रीडी थिएटरसुद्धा आहेत.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात याच स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक संयुक्त कार्यक्रम झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here