महाराष्ट्राची कन्या पोहचली पुरस्काराच्या सर्वोच्च शिखरावर!

प्रियंकाला गिर्यारोहण या प्रचंड साहसी क्रीडा प्रकारातील सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरींसाठी पुरस्कार जाहीर झाला.

महाराष्ट्राची शिखर कन्या प्रियंका मोहिते हिला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रियंकाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सोबतच सातारकर ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो अभिमानास्पद क्षण येऊन ठेपला. प्रियंकाला भारत सरकारमार्फत दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च म्हणता येईल असा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2021’ जाहीर झाला आहे.

महाराष्ट्राची पहिली महिला गिर्यारोहक

हा अत्युच्च पुरस्कार प्रियंकाचा गुणगौरव तर आहेच त्याचबरोबर प्रियंकाच्या पर्वतीय साहसाला कारणीभूत ठरलेला गिरीदुर्गराज सह्याद्री, मराठी माणसातील प्रखर जिद्द आणि साहस, तसेच ललामभूत महाराष्ट्राचाही अभिमान आहे. गिर्यारोहणातील विशेष उल्लेखनीय कामगिरीकरिता महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा तिला 2019 साली मिळाला. जगातील 14 अष्टहजारी हिमशिखरांपैकी 4 हिमशिखरांवर निर्विवाद आणि निर्भेळ यश मिळवणारी प्रियंका ही पहिली महाराष्ट्राची महिला गिर्यारोहक म्हणून जगभरात सुप्रसिद्ध आहे.

(हेही वाचा : शेतक-यांपेक्षा व्यापारी करतात अधिक आत्महत्या! जाणून घ्या आकडेवारी)

प्रियंकाला मिळालेले बहुमान

इतकेच नाही, तर जगातील सर्वोच्च असा माऊंट एव्हरेस्टवर वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी सर करून मिळवलेल्या तगड्या यशानंतर, जगातील चौथे अत्युच्च ल्होत्से (8,516 मीटर), पाचवे अत्युच्च मकालू (8,463 मीटर) आणि 2021 मध्ये तर अत्यंत भयावह असे 10 वे अत्युच्च अन्नपूर्णा (8,091 मीटर) या हिमशिखरांवर यशस्वीरित्या चढाई देखील केली, ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली. त्यामुळेच तिच्या उदंड साहसाचा सन्मानपूर्ण गुणगौरव या पुरस्कारामुळे झालेला आहे. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्लीत एका सोहळ्यात प्रियंकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

का दिला जातो हा पुरस्कार?

हा पुरस्कार सन 1993 पासून जमीन, पाणी, पर्वत आणि आकाशातील साहसांकरिता विशेषत्वाने सुरु करण्यात आला आहे. प्रियंकाला गिर्यारोहण या प्रचंड साहसी क्रीडा प्रकारातील सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरींसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here