-
ऋजुता लुकतुके
इराणी चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी मुंबई संघाला एक धक्का बसला आहे. रणजी स्पर्धेची अंतिम फेरी आणि दुलिप करंडक आपल्या कामगिरीने गाजवणारा युवा फलंदाज मुशीर खान उत्तर प्रदेशमध्ये एका रस्ते अपघातात जखमी झाला आहे. त्याचं हाड मोडलं असून त्यामुळे तो आगामी इराणी चषक आणि रणजी स्पर्धेतील सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. इराणी चषकाच्या अंतिम सामन्यासाठीच तो आपले वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान यांच्याबरोबर लखनौला निघाला होता. (Mushir Khan Accident)
(हेही वाचा- Ujjain Mahakal Temple: महाकाल मंदिरातील भिंत कोसळली! दोघांचा मृत्यू, दोन जखमी)
मुशीर इतर मुंबईकर खेळाडूंबरोबर नव्हता. तो आझमगडहून लखनौला प्रवास करत होता. पण, शनिवारी पहाटे त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात मुशीरचं हाड मोडलं आहे. १९ वर्षीय मुशीर मुंबई विरुद्ध शेष भारत संघादरम्यान होणाऱ्या इराणी चषकाच्या अंतिम लढतीत मुंबईचा प्रमुख खेळाडू होता. आतापर्यंत प्रथमश्रेमी क्रिकेटमध्ये ९ सामन्यांत ५१.१४ च्या सरासरीने त्याने ७१६ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ शतकं आणि १ अर्धशतक झळकवलं आहे. तर आपल्या डावखुऱ्या फिरकीने त्याने ८ बळीही मिळवले आहेत. (Mushir Khan Accident)
फक्त इराणी चषकच नाही तर भारतीय अ संघ येत्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलियाचा सराव दौरा करणार आहे. या दौऱ्यातही मुशीरचं स्थान जवळ जवळ पक्कं होतं. पण, ही संधीही आता जवळ जवळ जाणार आहे. सध्या भारताच्या कसोटी संघात खेळत असलेला सर्फराझ खानचा मुशीर हा लहान भाऊ आहे. गेल्या हंगामात मुंबईकडून खेळताना उपउपान्त्य सामन्यात बडोद्याविरुद्ध त्याने नाबाद २०३ धावा केल्या होत्या. तर अंतिम सामन्यात विदर्भाविरुद्ध १३६ धावा करत त्याने मुंबईला विजय मिळवून दिला होता. (Mushir Khan Accident)
मुशीर खानच्या अपघाताच्या बातमीनंतर अजून मुंबई क्रिकेट असोसिएशनने याविषयी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, ते लवकरच मुशीरऐवजी बदली खेळाडूची घोषणा करतील. इराणी चषकाचा अंतिम सामना १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान लखनौच्या एकाना स्टेडिएमवर होणार आहे. (Mushir Khan Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community