- ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं. टोकयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावलेल्या नीरजचं यंदा सुवर्ण मात्र हुकलं. पाकिस्तानच्या नदीन अरशदने ९२.९३ मीटरची अविश्वसनीय फेक करून सुवर्ण आपल्या नावावर केलं. सुवर्ण हुकलं असलं तरी सगळं संपलेलं नाही. खेळ अजून बाकी आहे अशी आश्वासक प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिली आहे.
रौप्य पदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आपल्या भावना व्यक्त केल्या. “सध्या पदक मिळालं आहे. हातात तिरंगा आहे. मला खूप आनंद होत आहे. आणखी भरपूर काम करायचं बाकी आहे. बऱ्याच काळापासून मी दुखापतीचा सामना करतो आहे. दुखापतीमुळे जेवढ्या स्पर्धा खेळायला हव्यात तेवढ्या मी खेळू शकत नाहीये. दुखापतीमुळे मला माझ्या चुकांवर काम करता येत नाहीये. या चुकांवर काम झाल्यास चांगला परिणाम दिसेल,” अशा भावना नीरजने व्यक्त केल्या.
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : अल्जेरियाची वादग्रस्त मुष्टियोद्धा इमान खलिफला सुवर्ण )
तसेच पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शदने भाला फेकल्यानंतर मला मनातून वाटत होतं की आपण हे करू शकतो. मी आतापर्यंत ९० मीटरपर्यंत भाला फेकलेला नाही. पण मी हे करू शकतो असं मला अंतर्मनातून वाटत होतं. मी ८९ मीटरपर्यंत भाला फेकू शकलो. माझी ही कामगिरी काही कमी नाही. पण तेच सांगतोय की खेळ अजून संपलेला नाही. आणखी खूप काही बाकी आहे. ज्याने सुवर्णपदक पटकावले त्याने मेहनत केली आहे, त्याच्या कामगिरीचे कौतुक करावेच लागेल, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने (Neeraj Chopra) दिली.
View this post on Instagram
नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले आहे. नीरजच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. नीरज पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरित करित राहील, असं मोदी म्हणाले. तर नीरजच्या या कामगिरीवर त्याची आई सरोज देवी यांनीदेखील आनंद व्यक्त केलाय. नीरज घरी आल्यावर मी त्याला त्याच्या आवडीचे जेवण खायला देणार आहे. त्याला मिळालेल्या पदकामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे. ज्या खेळाडूला सुवर्णपदक मिळालं, तोदेखील माझ्या मुलासारखाच आहे, असे सरोज देवी म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community