Netherlands Stun South Africa : नेदरलँड्सचा द आफ्रिकेला दे धक्का, कसा मिळवला तगड्या संघाविरुद्ध विजय 

यंदाच्या विश्वचषकातील दुसरा खळबळजनक विजय मिळवताना नेदरलँड्सने तगड्या दक्षिण आफ्रिकेवर ३८ धावांनी मात केली. गुणतालिकेतही यामुळे मोठा फरक पडलाय. बघूया नेदरलँड्सने कसा साकारला विजय 

158
Netherlands Stun South Africa : नेदरलँड्सचा द आफ्रिकेला दे धक्का, कसा मिळवला तगड्या संघाविरुद्ध विजय 
Netherlands Stun South Africa : नेदरलँड्सचा द आफ्रिकेला दे धक्का, कसा मिळवला तगड्या संघाविरुद्ध विजय 

ऋजुता लुकतुके

या एकदिवसीय विश्वचषकातील ३ दिवसांतला दुसरा खळबळजनक निकाल काल (१७ ऑक्टोबर) धरमशाला इथं नोंदवला गेला. (Netherlands Stun South Africa) आतापर्यंत या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या आणि एका डावात ४०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला चक्क नवख्या नेदरलँड्स संघाने ३८ धावांनी हरवलं. विजयासाठी २४६ धावांचं लक्ष्य समोर असताना आफ्रिकन फलंदाज पुन्हा एकदा चोक झाले. आणि डच फिरकीच्या जाळ्यात अडकले. ४२.५ षटकांत २०७ धावांमध्ये आफ्रिकन संघ गारद झाला. २०११ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या नेदरलँड्सने विजय कसा साकारला ते पाहूया..

जे डच फलंदाजांना जमलं ते डी-कॉक माकरमला नाही जमलं 

धरमशाला मैदानाचं रंगरुपच पावसाने बिघडवून टाकलं होतं. आऊटफिल्ड न बघण्यासारखी खळग्यांनी भरलेली होती. अशावेळी सामनाही ४३ षटकांचा झाला. आणि खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत होती. पहिली फलंदाजी करताना नेदरलँड्सची अवस्थाही २७ व्या षटकांत ११२ वर ६ अशी बिकट होती. पण, कर्णधार आणि यष्टीरक्षक स्कॉट एडवर्ड्सने ६९ चेंडूत ७८ धावा करत संघाची बाजू सावरली. आणि संघाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला.

(Netherlands Stun South Africa) जी कामगिरी डच मधल्या फळीने केली, ती अनुभवी आफ्रिकन फलंदाजांना नाही जमली. उलट डेव्हिड मिलरचा अपवाद वगळता इतरांनी सपशेल नांगी टाकली. क्विंटन डी कॉक आणि एडन मार्करम यांचा बळी गेल्यावर धक्क्यातून आफ्रिकन फलंदाज सावरलेच नाहीत. इतकंच नाही, तर जम बसल्यावर चुकीचा फटका खेळण्याची शिक्षा क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांना भोगावी लागली. शेवटी केशव महाजनने ४० धावा केल्या. पण, तोपर्यंत उशीर झाला होता.

डच गोलंदाजांनी खेळपट्टीचा अचूक फायदा उचलत आधी क्रॉस सिम आणि मग फिरकीच्या जाळ्यात आफ्रिकन फलंदाजांना ओढलं. आणि संकटात सापडलेली आफ्रिकन टीम चोक होते, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं.

(हेही वाचा-Israel-Hamas Conflict : इस्लामिक जिहाद गटाकडून चुकीच्या रॉकेट प्रक्षेपणामुळे विस्फोट !)

आफ्रिकेची स्वैर गोलंदाजी 

रबाडा, एनगिडी आणि कोएट्झी ही काही नवखी गोलंदाजांची फळी नाही. पण, फलंदाजीच्या तुलनेत या आफ्रिकन संघाची गोलंदाजी नाही म्हटलं तरी थोडी दुबळी होती. डच फलंदाजांनी त्यातले कच्चे दुवे पुन्हा एकदा उघड केले. पण, एनगिडी आणि रबाडा या महत्त्वाच्या गोलंदाजांनी काल धावा लुटल्या. आणि त्यातही ३२ धावा तर त्यांनी अवांतर दिल्या. याचा फटका आफ्रिकन संघाला बसला. कारण, डच कर्णधार एडवर्ड्‌सच्या ७८ धावा सोडल्या तर त्याच्यानंतर सर्वाधिक धावा होत्या त्या अवांतरच. शेवटच्या ५ षटकांत आफ्रिकन गोलंदाजांनी ६८ धावा लुटल्या.

डच पार्ट-टाईम क्रिकेटपटू 

नेदरलँड्स हा देश फुटबॉलप्रेमी. क्रिकेटला इथं थोडफार स्थान मिळवून दिलं ते स्थलांतरित खेळाडूंनी. यंदा डच टेलीव्हिजनवर विश्वचषकाचे सामने थेट प्रसारित होतायत याचंच कौतुक खेळाडूंना स्पर्धेपूर्वी वाटत होतं. संघात एकमेव पूर्णवेळ क्रिकेटला वाहून घेतलेला व्यावसायिक क्रिकेटपटू आहे तो म्हणजे बास दी लीड. पॉल व्हॅन मीकरन हा संघातील खेळाडू क्रिकेट खेळत नसताना उबर ईट्सचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. एकरमन आणि व्हॉन देअर मर्व्ह हे तर निर्वासित म्हणून इथं आले.

पण, या सेमी व्यावसायिक खेळाडूंनीच मेहनतीने डच संघ उभा केला आहे. मेहनत आणि चिकाटीमुळेच ११ महिन्यांपूर्वी त्यांनी टी-२० विश्वचषकात आफ्रिकन संघाला पहिल्यांदा हरवलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी आफ्रिकेलाच दे धक्का दिला आहे.

सरस डच गोलंदाजी 

खरंतर आफ्रिकेकडे लुंगी एनगिडी, रबाडा आणि जेनसन हे तगडे आणि वेगवान गोलंदाज आहेत. ढगाळ वातावरणात ते आणखी प्रभावी ठरतील असाच सगळ्यांचा होरा होता. पण, प्रत्यक्षात एनगिडी आणि जेनसन यांनी धावा लुटल्या. त्या विरुद्ध आयपीएल खेळलेल्या व्हॅन देअर मर्व्ह आणि पॉल व्हेन मीकरन यांनी महत्त्वाचे बळी टिपत आफ्रिकन फलंदाजीला सुरुंग लावला. व्हॅन देअर मर्व्ह आणि एकरमन यांनी बुवामा आणि क्विंटन डी कॉक हे महत्त्वाचे बळी मिळवले. तर धोकादायक मार्करम आणि जम बसलेल्या जेनसनला मीकरनने बाद केलं. हे सगळे चेंडू कसोटी क्रिकेटमध्ये शोभतील इतके अचूक होते.

आपल्या हार न मानण्याच्या वृत्तीमुळे डच खेळाडूंनी हा विजय साध्य केला. आणि त्यामुळे गुणतालिकेतही आता मोठे फेरफार झाले आहेत. आफ्रिकन संघ ३ सामन्यांत २ विजयांसह तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. तर भारत पहिल्या स्थानावर आहे. आणि दुसऱ्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलियाचा संघ. पाकिस्तान चौथ्या तर इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे. आधी अफगाणिस्तान आणि आता नेदरलँड्सच्या धक्कादायक विजयांमुळे विश्वचषकात चुरस निर्माण झाली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.