-
ऋजुता लुकतुके
सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही बॅडमिंटन दुहेरीतील भारतीय जोडी याच आठवड्यात जागतिक क्रमवारीत अव्वल ठरली आहे. आता त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांच्यासाठी पुढचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. सात्त्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन दुहेरीतील भारतीय जोडीने आशियाई खेळांमध्ये सुवर्ण जिंकून इतिहास रचला. बॅडमिंटनमधील भारताचं आशियाई खेळातील पहिलं सुवर्ण होतं. या विजेतेपदाबरोबरच भारतीय जोडगोळी जागतिक क्रमवारीतही आता अव्वल स्थानावर पोहोचली आहे. (Satwik-Chirag)
२०२३ चं वर्षं सात्त्विक साईराज आणि चिरागसाठी यशदायी ठरलं आहे. दोघांनी स्वत:साठी निर्धारित केलेली एकेक उद्दिष्टं यावर्षी पार केली आहेत आणि या त्यांच्या कामगिरीत त्यांना मार्गदर्शन लाभलंय ते डॅनिस खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक मथियास बो यांचं. मथियास बो यांनी आता भारतीय जोडीसाठी पुढील उद्दिष्टंही निर्धारित केलं आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात दुहेरीच्या जोडीची वानवा मागचा काही काळ होती. सांघिक स्पर्धांमध्ये त्यामुळे भारतीय आव्हान कमी पडत होतं. मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी दुहेरीतील पोकळी भरून काढण्यासाठी आधी भिन्न स्वभावामुळे एकत्र खेळण्याची इच्छा नसलेल्या सात्त्विक साईराज आणि चिराग यांना दुहेरीत खेळण्यासाठी राजी केलं. (Satwik-Chirag)
(हेही वाचा – World Cup 2023 : भारत- पाक सामन्यासाठी दोन विशेष वंदे भारत ट्रेन, पहा काय आहे नियोजन)
आणि त्यानंतर २०२१ मध्ये या जोडीला तयार करण्यासाठी डॅनिश बॅडमिंटनपटू मथियास बो यांची मदत मागितली. ते भारतात यायला तयार झाले. आणि तेव्हापासून या जोडीबरोबर काम करत आहेत. ऑल इंग्लंड विजेतेपद, सुपर सीरिजमधील विजेतेपदं आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकं हा प्रवास या तिघांनी एकत्र केला. आता प्रशिक्षक म्हणून मथियास बो यांना आपल्या शिष्यांनी ऑलिम्पिक पदक मिळवावं असं वाटतं. कांस्य पदकाने त्यांचं समाधान होणार नाहीए. त्यांना हवंय सुवर्ण पदक. (Satwik-Chirag)
भारतीय जोडीकडे आक्रमकता आधीपासूनच होती. बो यांनी त्यांना रणनिती आणि बॅडमिंटनमधील डावपेच शिकवले. आता तिघांनी पॅरिस ऑलिम्पिकची तयारी सुरू केली आहे. पण, ऑलिम्पिकसाठी अजून १२ महिनेही नाहीएत. त्यामुळेच बो आणि भारतीय जोडीसमोरचं आव्हान मोठं आहे. ‘दोघांकडेही पुरेपूर ताकद आहे. बॅककोर्टवरूनही दोघं ताकदीने फटके खेळू शकतात. आता त्यांना आपल्या आपल्या बचावाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यावरच आम्ही काम करू,’ असं मथियास बो टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. सुदैवाने क्रमवारी आणि चांगल्या कामगिरीमुळे भारतीय जोडीने ऑलिम्पिक पात्रता आधीच मिळवली आहे. आता मोठ्या स्पर्धेसाठी लागते तशी मोठी आणि फोकस ठेवून तयारी मथियास बो यांना करायची आहे. (Satwik-Chirag)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community