ब्राझीलचा आघाडीचा फुटबॉलपटू नेमार दोन वर्षांसाठी सौदी अरेबियाच्या अल् हिलाल क्लबकडून प्रो लीग खेळणार आहे. सौदी वर्तमानपत्रांनी याबद्दलची बातमी दिली आहे. विशेष म्हणजे नेमार सध्या करारबद्ध असलेला पॅरिस सेंट गोमेन्स हा क्लबही कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट्स या अरब देशाच्याच मालकीचा क्लब आहे.
पॅरिस सेंट गोमेन्स क्सबने या कराराबद्दल कुठलीही बातमी दिलेली नाही. पण, मीडिया अहवालानुसार, नेमारला या हस्तांतरणासाठी १७५ दशलक्ष अमेरिकन डॉलर मिळणार आहेत. यातील हस्तांतरणाची फी असेल ९० दशलक्ष अमेरिकन डॉलर. बाकी फी त्याचे इतर भत्ते आणि खर्च यासाठी असेल.
अशा करारांपूर्वी खेळाडूची वैद्यकीय चाचणी घेऊन सामने खेळण्यासाठी तो तंदुरुस्त आहे की नाही हे बघितले जाते. नेमारने सोमवारीच पॅरिस इथं अशी वैद्यकीय चाचणी दिली असल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. त्यानंतर बुधवारी तो रियाध इथं दाखल होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण)
नेमारला इथं १० क्रमांकाची जर्सी मिळेल असं बोललं जातंय. अल् हिलाल संघ येत्या शनिवारी अल् फाया क्लबविरोधात सामना खेळणार आहे. इथं त्याचे प्रशिक्षक असतील पोर्तुगालचे जॉर्ज जिझस. नेमार हा २०१७ मध्ये बार्सिलोना संघाकडून पॅरिस सेंट गोमेन्स संघात आला. तेव्हा त्याचा २४३ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा करार गाजला होता.
पॅरिस संघासाठी शनिवारच्या सामन्यात तापामुळे नेमार खेळू शकला नव्हता. पॅरिस सेंट गोमेन्स संघाबरोबर त्याचा करार २०२५ पर्यंत आहे. पण, अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळवणं त्याला कठीण जात आहे. त्यामुळे नेमारने जुन्या बार्सिलोना क्लबकडे परत जाण्याचा विचारही केला होता. पण, असं समजतं की, बार्सिलोना क्लबला हस्तांतरणासाठी मागितलेले पैसे परवडणारे नव्हते.
दुसरीकडे अल् हिलाल क्लबनेही नेमारच्या आधी फ्रेंच स्टार कायलन एमबापे आणि लियोनेल मेस्सी यांच्यासाठी प्रयत्न केले होते. पण, एमबापे त्याचा सध्याचा क्लब पॅरिस सेंट गोमेन्सकडेच खुश आहे. तर मेस्सीने अमेरिकेत मेजर लीग खेळण्याला पसंती दिली आहे. ३१ वर्षीय नेमारने राष्ट्रीय संघ ब्राझीलसाठी १२४ सामन्यांमध्ये ७७ गोल केले आहेत.
Join Our WhatsApp Community