ऋजुता लुकतुके
मुष्टीयुद्ध हा खेळ खरंतर १९२० पासून प्रत्येक ऑलिम्पिकचा भाग राहिला (No Boxing in Olympics) आहे. आणि पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही या खेळाचा समावेश आहे. पण, त्यानंतर २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमधील समावेश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सध्या विचाराधीन ठेवला आहे. परिषदेच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मुष्टीयुद्धाची जागतिक संघटना आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध असोसिएशनमधील भांडणं त्यासाठी कारणीभूत आहेत. या संघटनेचे अध्यक्ष रशियन उमर क्रेमलेन हे आहेत. आणि त्यांचं ऑलिम्पिक खेळांच्या समितीबरोबर भांडण सुरू आहे. त्यानंतर याचवर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं ऑलिम्पिक खेळांच्या मोहिमेतून मुष्टीयुद्ध संघटनेला बडतर्फही केलं. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध असोसिएशन भरवत असलेल्या स्पर्धांच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
तसंच स्पर्धा आयोजनासाठी लागणारा निधी उभारणं संघटनेसाठी कठीण जाणार आहे. त्यातच आता खेळाच्या ऑलिम्पिक समावेशावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मुंबईतील बैठकीत २०२८ च्या ऑलिम्पिकमधील खेळांवर चर्चा झाली. आणि मुष्टीयोद्धाचा विषय निघाला तेव्हा या खेळावर सध्या चर्चा नको, असंच सदस्यांचं म्हणणं पडलं.
(हेही वाचा-Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सुधारित वेळापत्रक सादर करणार ?)
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं मुष्टीयोद्धातील इतर कुठल्याही संघटनेला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्घ असोसिएशन ही एकमेव मान्यताप्राप्त संघटना आहे. त्यामुळे ऑलिम्पिक मोहिमेत पुन्हा समावेशासाठी याच संघटनेशी वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. किंवा इतर कुठल्या संघटनेला मान्यता द्यायची का, यावर आधी निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणूनच सध्या मुष्टीयुद्धाच्या समावेशाचा मुद्गाच बाजूला सारण्यात आला.
‘२०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये मुष्टीयुद्धाचा समावेश करायचा की नाही, हा निर्णय सध्या अधांतरी ठेवण्यात आला आहे. पुढे या मुद्दयावर चर्चाच झाली नाही,’ असं ऑलिम्पिक परिषदेनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तर २०२८ ऑलिम्पिक खेळांचे अध्यक्ष कॅसी वासरमन यांनी मुष्टीयुद्ध या खेळाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘अमेरिकेत मुष्टीयुद्ध खेळाला मोठी परंपरा आहे. जगभरात हा खेळ लोकप्रिय आहे. त्यामुळे आम्हाला हा खेळ ऑलिम्पिकमध्ये हवा आहे. पण, त्याविषयीचा निर्णय सर्वस्वी ऑलिम्पिक परिषदेच्या हातात आहे,’ असं वासरमन मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी मुष्टीयुद्ध हा खेळ नाही तर खेळाच्या संघटनेशी आमचं वितुष्ट आहे, अशी भूमिका जाहीर केली आहे.
थोडक्यात सध्या तरी मुष्टीयुद्ध खेळाचं ऑलिम्पिकमधील भवितव्य अंधारात आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मात्र त्याचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये या प्रकारात ३ कांस्य पदकं जिंकली आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community