-
ऋजुता लुकतुके
यंदाच्या युएस ओपनमध्ये (US Open) अव्वल सिडेड खेळाडूंच्या पराभवाची मालिका पहिल्या आठवड्यात सुरूच राहिली आहे. आता तिसऱ्या फेरीत भर पडली आहे ती तिसरा सिडेड आणि २५ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्बियन नोवाक जोकोविचची. (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियाची युवा खेळाडू ॲलेक्सी पॉपिरिनने (Alexey Popyrin) त्याचा ४ सेटमध्ये ६-४, ६-४, २-६ आणि ६-४ असा पराभव केला. सामना संपल्यानंतर जोकोविच काहीसा नाराज दिसला आणि तडक खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला. गुरुवारी मध्यरात्री कार्लोस अल्काराझचंही (Carlos Alcaraz) स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलं होतं. आता मागोमाग नोवाक जोकोविचलाही गाशा गुंडाळावा लागला आहे.
पॉपिरन आणि जोकोविच यांच्यातील हा चौथा सामना होता. आणि यात जोकोविच ३-१ असा पुढे असला तरी अलीकडच्या सामन्यांमध्ये २५ वर्षीय पॉपिरिनने आपली चमक दाखवून दिली आहे. आताही सर्व्हिस आणि बेसलाईनवरून जोरकस फटके मारण्यात तो जोकोविचविरुद्ध पुढे होता. सर्वांगसुंदर खेळामुळे पहिले दोन सेट त्याने एकेकदा सर्व्हिस भेदून सहज मिळवले. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने निकराचा प्रयत्न करत हा सेट ६-२ असा खिशात घातला. चौथा आणि शेवटचा सेट रंगतदार झाला. इथं दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला एकमेकांच्या सर्व्हिस भेदण्याचा सपाटाच लावला. पण, त्या प्रयत्नांत पॉपिरिनने जोकोविचची सर्व्हिस दोनदा भेदली. आणि म्हणता म्हणता ५-२ अशी आघाडीही घेतली. पण, त्यानंतर जोकोविचने पुढील दोन गेम जिंकून सामन्यात टिकून राहण्याचा प्रयत्न केला. पण, ५-४ वर सर्व्हिस करताना पॉपिरिनने पुढील गेम जिंकून सामनाही खिशात टाकला. चौथा सेट एक तास चालला. आणि एकूण सामना साडेतीन तास.
(हेही वाचा – रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर Megablock! वेळापत्रक एकदा बघाच)
Alexei Popyrin’s reaction after breaking Novak Djokovic in the 4th set at US Open
Long, steady rally.
Going toe to toe with a legend from the baseline.
Until he just UNLEASHES on the forehand.
Huge roar.
Inject this into my veins. 😤
— The Tennis Letter (@TheTennisLetter) August 31, 2024
(हेही वाचा – Vinesh Phogat : विनेश फोगाटची अमृतसर इथं सुवर्ण मंदिराला भेट)
ॲलेक्सी पॉपिरिन हा २५ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. आणि अगदी गेल्याच आठवड्यात कॅनडा ओपनमध्ये दमदार कामगिरी करून तो युएस ओपनमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. एकाच महिन्यापूर्वी त्याची जागतिक क्रमवारी ६३ इतकी खाली होती. पण, पहिल्या २० खेळाडूंमधील ५ खेळाडूंची शिकार करत तो कॅनडात अंतिम फेरीत पोहोचला. आणि तिथेही पाचव्या सिडेड आंद्रे रुबलेवचा पराभव करत त्याने पहिली एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकली. या यशानंतर युएस ओपनमध्ये त्याचा आत्मविश्वास वाढला नसता तरंच नवल.
आपल्यापेक्षा वरचढ खेळाडूंना हरवण्यात पॉपिरिन माहीर आहे. २०२१ मध्ये पहिलं एटीपी विजेतेपद त्याने पटकावलं ते सिंगापूरला अलेक्झांडर बॉबिलिकला हरवून. त्यानंतर २०२२ मध्ये क्रोएशिया इथं त्याने स्टॅनिस्लास वॉवरिंकाला हरवत विजेतेपद पटकावलं. आणि आता कॅनडा (Canada) ओपनची भरही पडली आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही पॉपिरिनने दुसरा सेट जिंकून जोकोविचसमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची चौथी फेरी गाठण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत त्याला २८ वं सिडिंग मिळालं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community