आता ऑलिम्पिकसाठी जाणा-या खेळाडूंना मुंबईत अशी मिळणार लस

ही सवलत ३१ ऑगस्‍ट २०२१ पर्यंत लागू राहणार आहे.

शैक्षणिक कारणांसाठी, नोकरीसाठी विदेशात जाण्‍यास इच्‍छुक नागरिकांसह टोकियो ऑलिम्पिकमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी जाणाऱ्या खेळाडूंना, आता आठवड्यातील सोमवार ते शनिवारपैकी कोणत्याही दिवशी महापालिकेने नेमून दिलेल्‍या ७ समर्पित कोविड लसीकरण केंद्रांवर लस घेता येईल. यापूर्वी सोमवार ते बुधवार हे लसीकरण करण्यात येत होते. ही सवलत ३१ ऑगस्‍ट २०२१ पर्यंत लागू राहणार आहे.

या केंद्रांवर होणार लसीकरण

मुंबई महापालिका प्रशासनाच्‍या वतीने मुंबईत कस्तुरबा रुग्‍णालय, परळ येथील केईएम रुग्‍णालय, अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालय, विलेपार्ले येथील डॉ. कूपर रुग्‍णालय, गोवंडी येथील महापालिका शताब्‍दी रुग्‍णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्‍णालय, दहिसर जम्‍बो कोविड सेंटर या सात ठिकाणी विदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि ऑलिम्पिक खेळाडू यांच्‍यासाठी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.

(हेही वाचाः मुंबईतील उद्यानांना आता राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान यांची नावे)

केंद्र सरकारचे निर्देश

शैक्षणिक कारणासाठी, नोकरीसाठी आंतरराष्‍ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांनी किंवा टोकियो(जपान) मध्‍ये नियोजित ऑलिम्पिक क्रीडा स्‍पर्धांसाठी जाणाऱ्या खेळाडूंच्‍या लसीकरणामध्‍ये केंद्र सरकारच्‍या विविध निर्देशानुसार सुलभता आणली जात आहे. अशा नागरिकांनी कोविशिल्‍ड लसीचा पहिला डोस घेतल्‍यानंतर ८४ दिवस पूर्ण होण्‍यापूर्वीच, त्‍यांना विदेशात जाणे अत्‍यावश्‍यक असल्‍यास, पहिला डोस घेतल्‍यानंतर किमान २८ दिवसांनंतर त्‍यांना दुसरा डोस मिळू शकतो. तसेच संबंधित नागरिकांच्‍या लसीकरण प्रमाणपत्रावर आता त्‍यांचा पारपत्र(पासपोर्ट) क्रमांक देखील नोंदवला जातो. जागतिक आरोग्‍य संघटनेने कोविशिल्‍ड ही लस आपत्‍कालीन वापरासाठी मान्‍य केल्‍याने, लस प्रमाणपत्रावर कोविशिल्‍ड या लसीचा उल्‍लेख आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी पुरेसा आहे.

(हेही वाचाः आता मुंबईच्या मार्केटमधील विक्रेते होणार लसवंत! काय आहे महापालिकेचा निर्णय?)

या सर्व सुविधांबरोबरच आता मुंबई महापालिका प्रशासनाने गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे तीन दिवसही या गटातील नागरिकांच्‍या लसीकरणासाठी खुले केल्‍याने त्‍यांना विदेशात जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here