टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये एका सुवर्ण पदकासह ७ पदकांची कमाई केलेल्या भारतीय क्रीडा विश्वाचे आता २४ ऑगस्टपासून टोकियोमध्येच सुरु होणारी पॅरालिम्पिक २०२० हे पुढील लक्ष्य आहे. आजवर पॅरालिम्पिकमध्ये भारतील खेळाडूंनी १२ पदके मिळवली आहेत. त्यात आणखी भर पडेल, असा विश्वास नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर निर्माण झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘कर दे कमाल तू’ हे गीत बनवण्यात आले आहे.
यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत एकूण ९ क्रीडा प्रकार!
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताकडून २४ खेळाडू सहभाग घेणार आहेत. त्यात २० पुरुष आणि ४ महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या चमुचे नेतृत्व रियो ऑलिंपिक २०१६मध्ये उंच उडी या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळालेले मरियप्पन तांगवेल्लू हे करणार आहेत. २०१२ च्या लंडन पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताकडून १४ खेळाडू सहभागी झाले होते, तर २०१६च्या रियो पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये १९ खेळाडू सहभागी झाले होते. यंदाच्या स्पर्धेत ही संख्या आणखी वाढलेली आहे. चालू वर्षात दिव्यांग खेळाडूंसाठीच्या क्रीडा स्पर्धेवर २६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यातील १९ कोटी हे परदेशातील अत्याधुनिक साहित्य खरेदी, देशातील तसेच परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती यासाठी खर्च करण्यात आले.
(हेही वाचा : होय, ती माझी चूकच होती! वीर सावरकरांवरील वक्तव्यावर नितेश राणेंची कबुली)
यंदा अधिक पदके मिळण्याची शक्यता!
पिस्तुल शूटिंगमध्ये भारताला किमान २ पदकांची अशा आहे, मुख्य प्रशिक्षक सुभाष राणा यांनी तसा विश्वास व्यक्त केला आहे. यंदा सिंघराज आणि मनीष नरवाल या उत्कृष्ट नेमबाज यांच्यासह १० नेमबाज सहभाग घेणार आहेत. २०१६च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने ५ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला, त्यामध्ये ४ पदके मिळवली होती. ज्यामध्ये उंच उडीच्या क्रीडा प्रकारात मरियप्पन तांगावेल्लू यांनी ९ सप्टेंबर रोजी सुवर्ण पदक मिळवले. तर १४ सप्टेंबर रोजी देवेंद्र झाझरिया यांनी भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवले होते. दीपा मलिक यांनी गोळा फेकीत रौप्य पदक मिळवले. तर वरून सिंग भाटी यांनी ९ सप्टेंबर रोजी उंच उडी स्पर्धेत कांस्य पदक मिळवले. अशा प्रकारे रियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने ५ क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन ४ पदके मिळवली. आता यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताचे २४ खेळाडू ९ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार असल्याने यंदा अधिक पदके मिळवली जातील, अशी शक्यता आहे. ८३ देशांतील ४ हजार ४०० स्पर्धक या पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत.
Join Our WhatsApp Community