ऋजुता लुकतुके
भारतीय महिला हॉकी संघाने रविवारीच रांचीत (Olympic Hockey Qualifiers) आशियाई चॅम्पियन्स करंडक जिंकला आहे. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ पुन्हा एकदा रांचीत एकत्र येईल तो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याच्या इराद्यानेच. त्यासाठी संघाचा मुकाबला असेल तो जर्मनी, न्यूझीलंड, जपान, चिली, अमेरिका, इटली आणि झेक रिपब्लिक या संघांशी.
१३ ते २१ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा रांचीत मारंग गोमके जयपाल सिंग स्टेडिअमवर रंगेल. आणि स्पर्धेतील अव्वल तीन संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील.
‘आशियाई क्रीडास्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावं लागल्यामुळे भारतीय संघ व्यथित होता. अलीकडे आशियाई चॅम्पियन्स करंडकात आम्ही जुना हिशोब चुकता करण्याच्या हिशोबाने खेळलो. आता आमच्याकडे खरी संधी चालून आली आहे ती ऑलिम्पिकमध्ये समावेशाची. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू,’ असं भारतीय महिली संघाची कर्णधार सविताने म्हटलं आहे.
भारतीय संघ आता चांगला जमून आला आहे. आणि त्यातच संघाकडे पात्रता स्पर्धेपूर्वी चांगला वेळ हातात असेल. भारतात ही पात्रता स्पर्धा सुरू असताना अशीच एक स्पर्धा त्याचवेळी युरोपमध्ये होणार आहे. यात बेल्जिअम, ग्रेट ब्रिटन, स्पेन, दक्षिण कोरिया, आयर्लंड, कॅनडा, मलेशिया आणि युक्रेन हे संघ सहभागी होणार आहेत. यांच्यातूनही ऑलिम्पिकसाठीचे तीन संघ ठरतील.
पुरुषांची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा (Olympic Hockey Qualifiers) मस्कत आणि व्हॅलेंसिया इथं होणार आहे. पण, भारतीय पुरुषांचा हॉकी संघ आधीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community