टोकियो ऑलिम्पिकः कुठे आशा, कुठे निराशा! असा होता भारतासाठी शनिवारचा दिवस

शनिवारचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी संमिश्र ठरला आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच दिवशी भारताने रौप्य पदक मिळवल्यानंतर भारताला आता आणखी पदांची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी 69 किलो वजनी गटात महिला बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने उपांत्य फेरी गाठून भारतासाठी अजून एक पदक निश्चित केले आहे. मात्र, शनिवारचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी संमिश्र ठरला आहे. बॉक्सर अमित पांघल, तिरंदाज अतनू दास यांना उपांत्य पूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. तसेच मागील ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणा-या पी.व्ही सिंधूलाही सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली आहे.

मात्र, डिस्कस थ्रोमध्ये भारताची महिला अॅथलिट कमलप्रीत कौरने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे.

सिंधूने दिली कडवी झुंज

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची आशा व्यक्त करण्यात येत होती. पण सिंधुला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ताई जू यिंगने दोन सरळ सेटमध्ये तिचा पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या अशा या सामन्यात सिंधुने अत्यंत कडवी झुंज दिली. पण मिनिटे झालेल्या या लढतीत 18-21, 12-21 असा सरळ सेटमध्ये सिंधूचा पराभव झाला आहे. पण तरीही तिला अजून कांस्यपदक मिळवण्याची संधी आहे. कांस्यपदकासाठी सिंधूची लढत रविवारी चीनच्या बिंग जिओशी होणार आहे.

पुजा राणीचे पदक हुकले

69 ते 75 किलो वजनी गटासाठी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत बॉक्सर पुजा राणीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. चीनच्या क्यूएन ली ने तिचा पराभव केला आहे.

अतनू दासचा पदकावरील नेम चुकला

भारतीय पुरुष तिरंदाज अतनू दासला उपांत्य पूर्व फेरीत अपयश आले आहे. या पराभवामुळे टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील त्याचं आव्हान संपुष्टात आल्याने, त्याने स्वतः ट्वीट करत आपल्याला पाठिंबा देणा-या भारतीय चाहत्यांची क्षमा मागितली आहे. तसेच आपल्या चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत.

हॉकीमध्ये वंदनाची हॅट्रीक

भारतीय महिला हॉकी संघाने शेवटच्या काही मिनिटांत अतिरिक्त गोल करत सामना आपल्या खिशात घातला. दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या या सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने 4-3 ने विजय मिळवला आहे. यावेळी वंदना कटारियाने सलग तीन गोल करत हॅट्रीक केली. यामुळे एका गोलची बढत मिळून भारताचा विजय झाला.

कमलप्रीत अंतिम फेरीत

महिला अॅथलिट कमलप्रीत कौरने आपल्या शेवटच्या अटेंप्टमध्ये 64.00 मीटर लांबीचा थ्रो केला. या थ्रोमुळे तिला पुढं जायला संधी मिळाली. यामुळे तिने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्सच्या अंतिम फेरीत पोहोचणारी कमलप्रीत ही पहिली खेळाडू ठरली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here