टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानपुढे विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी भागिदारी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. यावेळी बाबर आझमने ४२ चेंडूत ५३ धावांची खेळी साकारली तर मोहम्मद रिझवानने ५७ धावांची खेळी केली. यामुळे पाकिस्तानचा या सामन्यात अगदी सहज विजय झाला.
आता भारतासमोर इंग्लंडचे आव्हान
गुरूवारी भारत विरुद्ध इंग्लंड असा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. इंग्लंडचे आव्हान स्वीकारण्यासाठी भारतीय संघ सुद्धा कसून सराव करताना दिसत आहे. भारतीय संघाचे सराव सत्रांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. तसेच कर्णधार रोहित शर्मा सुद्धा आता पूर्णपणे फिट असून तो इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती त्याने पत्रकार परिषदेत दिली आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे चांगली कामगिरी करणे हे भारतीय फलंदाजांसमोर मुख्य आव्हान असणार आहे. दरम्यान पाकिस्तानचा फायनल फेरीत प्रवेश झाल्यामुळे २००७ च्या विश्वचषक स्पर्धेची पुनरावृत्ती होणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community