टी-20 विश्वचषकः पाकिस्तानी चाहत्यांना वाटते पराभवाची भीती! थेट कर्णधाराला दिली धमकी

या हायव्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानच्या कर्णधाराला आलेली ही धमकी त्यांच्या मनातील पराभवाची भीती स्पष्टपणे दाखवून जात आहे.

166

17 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाचे रणशिंग फुंकले गेले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये होणारा क्रिकेटचा सामना हा एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतो. या युद्धाचा जीवंत थरार अनुभवण्यासाठी दोन्ही देशांचे क्रिकेटप्रेमी आपल्या घरातील टीव्हीसमोर डोळ्यात प्राण आणून बसलेले असतात. त्यामुळे या टी-20 विश्वचषकात 24 ऑक्टोबर रोजी होणा-या भारत-पाकिस्तान सामन्याची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत आहेत.

कुठल्याही विश्वचषकात पाकिस्तानला आजवर भारताला हरवता आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांचा चांगलाच जळफळाट होणं अगदी स्वाभाविक आहे. अशाच एका पित्त खवळलेल्या पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याने थेट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला धमकी दिली आहे.

काय आहे धमकी?

बाबर आझमने केलेल्या एका ट्वीटवर कमेंट करताना एका चाहत्याने त्याला सामना जिंकला नाही तर, घरीच येऊ देणार नाही, अशी थेट धमकी दिली आहे. आता भारतासोबतचा सामना हरल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे पुतळे जाळणं, त्यांच्या घरावर दगडफेक करणं यांसारख्या अनेक घटना घडल्याचे आजवर आपल्याला माहीतच आहे. तसेच चाहत्यांचे सामन्यानंतरचे दुःखात असलेले अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच येत्या 24 ऑक्टोबरला होणा-या या हायव्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानच्या कर्णधाराला आलेली ही धमकी त्यांच्या मनातील पराभवाची भीती स्पष्टपणे दाखवून जात आहे.

काय म्हणाले दोन्ही कर्णधार?

भारताचा कर्णधार विराट कोहली या सामन्याबद्दल बोलताना म्हणाला की, माझ्यासाठी हा सामना इतर सामन्यांसारखाच आहे. तर दुसऱ्या बाजूला हा सामना आम्हीच जिंकणार, असा (फाजील) विश्वास बाबरने व्यक्त केला आहे. यावर मी असे दावे करण्यात विश्वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया विराटने दिली. टीम इंडियाने  आतापर्यंत विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं आहे.

विराटकडे होत आहे तिकीटांची मागणी

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यबाबत काही वेगळं वाटतं का, असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना विराट म्हणाला की, मला असं कधी जाणवलं नाही. या सामन्याच्या तिकीटीसाठीची मागणी आणि विक्री जोरात सुरु आहे. माझ्याकडे अनेक मित्र हे तिकीट मागत आहेत. मात्र मला त्यांना नकार द्यावा लागत आहे.

हा नेहमीसारखाच सामना

हा सामना आमच्यासाठी अन्य सामन्यांसारखाच आहे. हा सामना खिलाडूवृत्तीने खेळायला हवा आणि आम्ही तसंच खेळू. क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टीने हा सामना वेगळा असेल. मात्र खेळाडूंसाठी हा नेहमीसारखाच सामना असतो, असं विराटने म्हटलं आहे.

या सामन्याचे तिकीटं मिळवण्यासाठी क्रिकेट प्रेमींमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. क्रिकेट चाहते दुप्पट-तिप्पट पैसे मोजून तिकीट घेण्यासाठी तयार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.