पॅरालिम्पिकचे बिगूल वाजले… भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला मंगळवार पासून सुरुवात झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीनंतर, आता पॅरालिम्पियन्सकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे. पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताचे तब्बल ५४ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या ५४ खेळाडूंमध्ये ४० पुरुष आणि १४ महिला खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असून, जास्तीत-जास्त पदकांची कमाई होईल, अशी आशा वर्तवण्यात येत आहे.

सर्वात मोठा संघ

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने सर्वात मोठा संघ यावेळी उतरवला आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू एकूण ९ खेळांत सहभागी होणार आहेत. याआधी रिओ पॅरालिम्पिक-2016 मध्ये १९ खेळाडूंचा संघ सहभागी झाला होता. यात भारताने २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशा चार पदकांची कमाई केली होती.

मोदींनी दिले प्रोत्साहन

या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातील भारतीयांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करुन सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाला या खेळाडूंचा अभिमान आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. जपानचे ऑलिम्पिक मंत्री सिको हाशिमोटो यांनी सहभागी देशांच्या खेळाडूंचे स्वागत केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here