- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक (Paris Olympic 2024) समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांचा अध्यक्षपदाचा दुसरा कालावधी २०२५ मध्ये संपत आहे. त्यानंतर या पदावर आपण राहू इच्छित नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. बाख हे जर्मन वकील आहेत. २०१३ पासून ते ऑलिम्पिक समितीची धुरा सांभाळत आहेत. आता ऑलिम्पिक नियमावलीनुसार, ठरलेल्या मुदतीत पद सोडावं असा विचार त्यांनी व्यक्त केला.
‘ऑलिम्पिक संविधानानुसार, एकाच व्यक्तीने १० वर्षांच्या वर महत्त्वाच्या पदावर राहू नये असा संकेत आहे. त्याचं पालन झालं पाहिजे असं मला वाटतं. शिवाय नेतृत्वात बदल हा संस्थेच्या हिताचा असतो. म्हणून २०२५ मध्ये मुदत संपली की, मला या पदावर राहायचं नाही आहे,’ असं बाख यांनी अलीकडेच स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचा – Supreme Court : शंभू सीमा अर्धवट उघडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश)
बाख यांची लोकप्रिय आणि तितकेच स्पष्टवक्ते अध्यक्ष अशी ओळख
खरंतर ऑलिम्पिक (Paris Olympic 2024) समितीच्या कार्यकारिणीतील अनेकांनी थॉमस बाख यांना पदावर कायम राहण्याची विनंती केली आहे. पण, अचानक निवृत्तीचं सुतोवाच करून त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ऑलिम्पिक परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बाख यांचा आवाज कातर झाला होता. ‘मला लोकांनी थांबण्याची विनंती केली हे खरं आहे. पण, नियम हा शेवटी नियम आहे आणि तो सगळ्यांना लागू व्हायला पाहिजे. ऑलिम्पिक संविधानात १० वर्षांच्या वर अध्यक्षाने पदावर राहू नये, असं सुचवण्यात आलंय आणि मला त्याचाच आदर करायचा आहे,’ असं ते म्हणाले.
आता वाख यांच्याजागी नवीन अध्यक्षाची निवड मार्च २०२५ मध्ये होईल. आतापर्यंत इतर कुठल्याही क्रीडा प्रशासकाने बाख यांची जागा घेण्याची इच्छा बोलून दाखवलेली नाही. थॉमस बाख हे जर्मनीचे माजी तलवारबाज आहेत. १९७६ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पदकही मिळवलं आहे. १९९१ मध्ये ते ऑलिम्पिक (Paris Olympic 2024) समितीचे सदस्य झाले आणि ११ वर्षांपूर्वी जॅकस रॉग यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतली. ऑलिम्पिक समितीचे लोकप्रिय आणि तितकेच स्पष्टवक्ते अध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community