Paris Olympic 2024 : मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं, २५ मीटर पिस्तुल प्रकारात चौथा क्रमांक

Paris Olympic 2024 : तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या शूट आऊटमध्ये मनू एका गुणाने मागे राहिली.

260
Paris Olympic 2024 : मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं, २५ मीटर पिस्तुल प्रकारात चौथा क्रमांक
  • ऋजुता लुकतुके

२२ वर्षीय मनू भाकरला अखेर २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. तिचं तिसरं कांस्य पदक अगदी एका शॉटने हुकलं. हंगेरीच्या व्हेरोनिका मायरबरोबरच्या पेनल्टी शूटआऊटवर मनू मागे पडली. पण, ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदकं जिंकून तिने इतिहास रचला आहे. २५ मीटरच्या अंतिम फेरीतही मनू नेहमीसारखी शांत आणि अचूक खेळत होती. अंतिम आठ जणांमध्ये पहिल्या सात सीरिजनंतर मनू २८ गुणांवर होती. व्हेरोनिकाही २८ वर होती. त्यामुळे शूटआऊटचा सहारा घ्यावा लागला. या प्रकारात कोरियाच्या जिन यांगने सुवर्ण पटकावलं. तर यजमान फ्रान्सच्या कॅमिलियाला रौप्य मिळालं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : हॉकीत भारताची बलाढ्य ऑस्ट्रेलियावर ३-२ ने मात, ५२ वर्षांनंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला हरवलं)

चौथं स्थान हे काही मला समाधान देणारं नाही – मनू

२५ मीटरची अंतिम फेरी सुरू झाली तेव्हा मनू भाकर सुरुवातीला सहाव्या स्थानावर होती. पण, सीरिज वाढत गेल्या तशी मनूने अचूक वेध घेणं सुरू केलं. अगदी दुसऱ्याच सीरिजमध्ये मनूने पाच पैकी पाचही वेळा लक्ष्य अचूक वेधलं आणि तिथपासून तिने मागे वळून पाहिलं नाही. ३ सीरिज झाल्यावर ती दुसऱ्या स्थानापर्यंत गेली होती. शूटआऊटच्या वेळी मात्र तिला थोडं दडपण जाणवलं. तिची चौथी फैर १०.२ पेक्षा कमी होती. उलट मायरने तो नेम अचूक साधला आणि ती पुढे गेली. (Paris Olympic 2024)

‘मी माझ्या तंत्रावर लक्ष केंद्रीत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण, यावेळी अंतिम फेरीपूर्वी मला थोडं दडपण जाणवत होतं. आणि त्याचा कामगिरीवर परिणाम झाला. मी पूर्णपणे प्रयत्न करून नेम साधण्यावर लक्ष केंद्रीत केलं. पण, एका क्षणी सामना हातातून निसटला. चौथं स्थान हे काही मला समाधान देणारं नाही. त्यामुळे मी पुढील ऑलिम्पिकची तयारी सुरू केली आहे, हे मी आताच सांगते,’ असं मनूने सामना संपल्यानंतर सांगितलं. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.