Paris Paralympics : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत प्रवीण कुमारला सुवर्ण

Paris Paralympics : उंच उडीच्या टी६४ प्रकारात सुवर्ण जिंकताना प्रवीणने आशियाई विक्रमही मोडला.

98
Paris Paralympics : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत प्रवीण कुमारला सुवर्ण
  • ऋजुता लुकतुके

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक (Paris Paralympics) खेळांत भारताने सुवर्ण पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. उंच उडीच्या टी६४ प्रकारात नवीन आशियाई विक्रमासह प्रवीण कुमारने सुवर्ण पदक नावावर केलं. २१ वर्षीय प्रवीण ३ वर्षांपूर्वी टोकयोमध्ये दुसरा आला होता. आता कामगिरीत सुधारणा करत २.०८ मीटरची उंची गाठून त्याने सुवर्ण नावावर केलं. उझबेकिस्तानचा तेमुरबेक गियाझोव दुसरा तर अमेरिकेचा लेरेक लॉक्सीडंट तिसरा आला. टी ६४ प्रकारात तुमच्या एका पायाच्या हालचाली गुडघ्याच्या खाली मंदावलेल्या असतात. काहीवेळा अजिबात हालचाल नसते. प्रवीण कुमारचा लहानपणापासून एक पाय दुसऱ्या पेक्षा छोटा आहे.

(हेही वाचा – Shiv Sena UBT ची २२ उमेदवारांची ‘पुडी’ काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी; उबाठाचे दबावतंत्र)

प्रवीणच्या सुवर्ण विजेत्या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं अभिनंदन केलं आहे. ‘नवीन आशियाई विक्रमासह सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल प्रवीण कुमारचं अभिनंदन. उंच उडी प्रकारात प्रवीणने कामगिरी उंचावून देशाचं नाव रोशन केलं आहे. त्याचं समर्पण आणि चिकाटी यामुळे हे यश साध्य झालं,’ असं पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात लिहिलं आहे. प्रवीणने तीन वर्षांपूर्वी टोकयोत रौप्य जिंकलं तेव्हा स्पर्धेतील सगळ्यात लहान पदकविजेता तो ठरला होता. मधल्या काळात त्याने आशियाई स्तरावर सुवर्ण तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य जिंकलं आहे. (Paris Paralympics)

(हेही वाचा – शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फिक्स; पण उद्धव ठाकरे नाही; Devendra Fadnavis यांचा दावा)

भारताचं यंदाच्या पॅरालिम्पिक (Paris Paralympics) खेळातील हे सहावं सुवर्ण ठरलं आहे. तर सुवर्ण, ९ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसह भारतीय संघ पदक तालिकेत चौदाव्या क्रमांकावर आहे. अवनी लेखरा, नितेश कुमार, धरमवीर सिंग, हरविंदर सिंग, सुमित अंतिल आणि आता प्रवीण कुमारने सुवर्ण कमाई केली आहे. भारतीय पथकाची पॅरालिम्पिक खेळांतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी टोकयोमध्ये भारताने ५ सुवर्णांसह एकूण २० पदकं जिंकली होती. आता सुवर्णही वाढली आहेत. तर पदकांची संख्या सध्या २६ वर गेली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.