प्रमोद भगतचा पॅरालिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ प्रताप!

जगातला नंबर-१ पॅरा शटलर प्रमोद भगतने ब्रिटनच्या डॅनियल बेथेलसोबतच अंतिम सामना अवघ्या ३६ मिनिटांमध्येच जिंकला.

भारताचा बॅडमिंटन पटू प्रमोद भगत याने टोकयो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवले. बॅडमिंटन सिंगल्स एसएल-३ स्पर्धेत त्याला हे पदक मिळाले असून टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे चौथे सुवर्ण पदक आहे. बॅडमिंटन सिंगल्समध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे.

३६ मिनिटांत जिंकला सामना!

याच स्पर्धेत भारताच्याच मनोज सरकार याने ब्रॉन्झ पदक पटकावले. आता भारताची पदकांची संख्या १७ झाली आहे. आतापर्यंतच्या पॅरालिम्पिकमधली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. जगातला नंबर-१ पॅरा शटलर प्रमोद भगतने फायनलमध्ये ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला २१-१४, २१-१७ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. प्रमोदने फक्त ३६ मिनिटांमध्येच  सामना जिंकला. तर मनोज सरकारने ब्रॉन्झ मेडलच्या मॅचमध्ये जपानच्या दायसुके फुजिहाराचा २२-२०, २१-१३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. ओडिसाच्या ३३ वर्षांच्या भगतने पहिल्या गेममध्ये आघाडी घेत २१-१४ ने विजय मिळवला, यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्याला प्रतिस्पर्ध्याने आव्हान दिले. बेथेलने ५-१ ची आघाडी घेतली, ही आघाडी बेथलने ११-४ पर्य़ंत पुढे नेली, पण भगतने लागोपाठ ६ पॉईंट्स घेऊन स्कोअर १०-१२ केला. यानंतर त्याने १५-१५ ने बरोबरी साधली आणि मग आघाडी घेत दुसरा गेम २१-१७ ने जिंकून सुवर्ण पदक मिळवले.

वयाच्या चौथ्या वर्षी प्रमोदला झालेला पोलिओ!

प्रमोद भगतला वयाच्या पाचव्या दिवशी पोलियो झाला होता. प्रमोद जगातल्या सर्वोत्तम पॅरा-शटलरपैकी एक आहे, त्याने आत्तापर्यंत ४५ आंतरराष्ट्रीय पदक जिंकली, यामध्ये चार वर्ल्ड चॅम्पियनशीपची गोल्ड मेडल आणि २०१८ आशियाई पॅरा खेळांमध्ये एक गोल्ड आणि एक ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here