पी.व्ही.सिंधूने जिंकले स्विस ओपन विजेतेपद!

118

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने स्विस खुली स्पर्धा 2022 चे अजिंक्यपद जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने स्विस ओपन सुपर 300 या स्पर्धेत रविवारी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. सिंधूने ओंगबामरुंगफानला 21-16, 21-6 असे नमवले. दुसरीकडे भारताचा एच. एस. प्रणॉय इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्ती विरुद्धच्या स्विस ओपन सुपर 300च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात हरला. इंडोनेशियाच्या बॅडमिंटनपटूने प्रणॉयचा 12-21, 18- 21असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

असा रंगला सामना

सुपर 300 बीडब्ल्यूएफ (विश्व बॅडमिंटन महासंघ) स्पर्धेत सिंधूने सुरुवातीपासून आपला दबदबा राखला होता. सुरुवातीला सिंधूने 3-० ची आघाडी घेतली होती. पण बुसानन हिने पलटवार करत 7-7 ने बरोबरी केली होती. बुसाननने सिंधूला नेटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण सिंधूने आक्रमक सुरुवात करत पलटवार केला. मध्यतंरानंतर सिंधूने अधिक आक्रमक खेळ करत, दोन अंकाची आघाडी घेतली. बॅकलाइनजवळ शानदार शॉट खेळत सिंधूने चार गुणांची कमाई केली. सिंधूने पहिला सेट जिंकत बुसाननवर दबाव निर्माण केला होता. त्यानंतर सिंधूने दुसरा सेट सहज जिंकला आणि स्पर्धा आपल्या नावावर केली.

( हेही वाचा :ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत चीनच्या स्पर्धेत! काय आहे प्लान? )

याआधीही केलीय सुवर्ण कामगिरी 

रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या सिंधूने ओंगबामरुंगफान विरुद्धचे 17 पैकी 16 सामने जिंकण्याची किमया करून दाखवली. सिंधू ओंगबामरुंगफान विरुद्ध फक्त 2019 च्या हाँगकाँग खुल्या स्पर्धेत हरली होती. मागच्या वेळी स्विस खुल्या सुपर 300 स्पर्धेत सिंधू हरली होती. सिंधूला रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने हरवले होते. स्विस खुल्या सुपर 300 स्पर्धेचा अंतिम सामना सेंट जेकबशाले येथे झाला. याच ठिकाणी सिंधू 2019 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकली होती. यंदाची स्विस खुल्या सुपर 300 स्पर्धा जिंकण्याआधी ती जानेवारी 2022 मध्ये लखनऊ येथे सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर 300 ही बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.