-
ऋजुता लुकतुके
दिग्गज टेनिसपटू आणि २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदं नावावर असलेला स्पेनचा राफेल नदाल अखेर आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त झाला आहे. डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीनंतर टेनिसचा हा स्पर्धात्मक हंगाम संपेल. तेव्हाच राफेल नदालचं पर्वही संपेल. ३८ वर्षीय राफेलने एक व्हीडिओ संदेश देऊन आपल्या निवृत्तीची गुरुवारी घोषणा केली. ‘शेवटची दोन वर्षं खरंतर आव्हानात्मक होती. पण, कारकीर्दीचा शेवट डेव्हिस चषकाने होणार म्हणून मी आनंदी आहे. कारण, माझ्या कारकीर्दीतील पहिलं यश मला याच स्पर्धेनं दिलं आहे. सेव्हिल इथं स्पेनसाठी मी विजयी कामगिरी केली होती. देशासाठी खेळणं हे शेवटी अभिमानाचं असतं,’ असं नदालने संदेशात म्हटलं आहे. (Rafael Nadal Retires)
राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच हे सध्याच्या टेनिसमधील तीन सर्वकालीन दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जातात. या तिघांनी मिळून ४६ ग्रँडस्लॅम विजेतेपदं जमवली आहेत. यातील नदालने जिंकेलली विजेतेपदं आहेत २२. यात त्याने तब्बल १४ वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. शिवाय या तीन दिग्गजांनी चारही प्रकारच्या टेनिस मैदानांवर बाजी मारली आहे. (Rafael Nadal Retires)
Mil gracias a todos
Many thanks to all
Merci beaucoup à tous
Grazie mille à tutti
谢谢大家
شكرا لكم جميعا
תודה לכולכם
Obrigado a todos
Vielen Dank euch allen
Tack alla
Хвала свима
Gràcies a tots pic.twitter.com/7yPRs7QrOi— Rafa Nadal (@RafaelNadal) October 10, 2024
फ्रेंच ओपनच्या क्ले कोर्टवर नदालची हार – जीतची टक्केवारी आहे ११२-४ अशी आहे. फ्रेंच ओपनमध्ये त्याने शेवटचं विजेतेपद २०२२ मध्ये मिळवलं. आणि त्यानंतर त्याला आधी गुडघ्याच्या आणि मग विविध दुखापतींनी सतावलं आहे. त्यामुळे तो नियमितपणे खेळूही शकलेला नाही. पुनरागमनाचा प्रयत्न त्याने केला. पण, दोनदा तो यात अपयशी ठरला. यंदा फ्रेंच ओपनमध्ये तो पहिल्याच फेरीत अलेक्झांडर झ्वेरेवकडून हरला होता. (Rafael Nadal Retires)
(हेही वाचा- Pune Hit and run : ऑडी चालकाने दुचाकीस्वाराला दिली धडक, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू)
आता डेव्हिस चषकाची बाद फेरी १९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. नदालला क्ले कोर्टचा बादशाह म्हटलं जातं. आपल्या दोन दशकांहून जास्त कारकीर्दीत त्याने एकूण ९२ विजेतेपदं पटकावली. बक्षीसाची रक्कम म्हणून १३५ दशलक्ष अमेरिकन डॉलरची कमाई केली. २००५ मध्ये १९ वर्षांचा होण्यापूर्वी काही दिवस आधी नदालने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. तीच त्याची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा ठरली. नदालने आपल्या कारकीर्दीत १४ फ्रेंच ओपन, २ बिम्बल्डन, ४ युएस ओपन आणि २ ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदं पटकावली आहेत. एटीपी क्रमवारीत तो तब्बल १७ वर्षं पहिल्या दहांत होता. स्पेनसाठी त्याने ५ वेळा डेव्हिस चषक जिंकला आहे. तर २००८ मध्ये ऑलिम्पिक सुवर्णही नावावर केलं आहे. (Rafael Nadal Retires)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community