ऋजुता लुकतुके
आशिया चषकासाठी श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे. संघ पहिल्या सामन्यासाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना द्रविड यांनी श्रेयस तसंच के एल राहुल या दोघांच्या तंदुरुस्तीवर भाष्य केलं. ‘श्रेयस अय्यर सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आणि तंदुरुस्तीसाठी असलेले सगळेच्या सगळे निकष सरावा दरम्यान श्रेयसने पूर्ण केले आहेत,’ असं राहुल द्रविड पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तर के एल राहुल ३ सप्टेंबरला भारतीय संघात दाखल होणार आहे. त्यामुळे नेपाळ तसंच पाकिस्तानबरोबरचे पहिले दोन सामने तो खेळू शकणार नाहीए.
श्रेयस मात्र पन्नास षटकांसाठी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करू शकत होता, ही गोष्ट द्रविड यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. ‘श्रेयस बाकी तंदुरुस्त आहे. त्याला आता फक्त स्पर्धात्मक क्रिकेटचा सराव हवा आहे. आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी श्रेयसला ती संधी आशिया चषकाच्या रुपात मिळणार आहे,’ असं राहुल द्रविड म्हणाले.
आशिया चषकात भारतीय संघ किमान पाच सामने खेळेल. आणि त्याचा उपयोग श्रेयस अय्यरला होईल अशी द्रविड यांची अपेक्षा आहे. एप्रिल महिन्यांत श्रेयस अय्यरला पाठदुखीचा जोरदार त्रास सुरू झाला. आणि मे महिन्यात त्याने लंडनमध्ये जाऊन दुखऱ्या पाठीवर शस्त्रक्रियाही करून घेतली. त्यानंतर बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत तो सराव करत आहे.
(हेही वाचा-BARC : बीएआरसीमध्ये ५०वर्षीय शास्त्रज्ञाची गळफास घेऊन आत्महत्या)
सध्याच्या भारतीय संघात फलंदाजांमध्ये श्रेयस अय्यरची सरासरी ४७.३६ इतकी आहे. सरासरीच्या निकषावर शुभमन गिल (६७.६६), रवींद्र जाडेजा (४९.७७) आणि लोकेश राहुल (४९.३३) यांची सरासरी श्रेयसपेक्षा जास्त आहे. पण श्रेयसने सर्वाधिक १,४२१ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाला सध्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची गरज आहे. याविषयी बोलताना राहुल द्रविड म्हणाले, ‘भारतीय संघात ३ आणि ४ क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य क्रिकेटपटू कोण याची सर्वाधिक चर्चा होते. पण, मला विचारला तर १८ महिन्यांपूर्वीच आम्ही फलंदाजीचा क्रम ठरवलेला आहे. संघासमोर ही समस्या नाहीच आहे.’
यानंतर राहुल द्रविड यांनी त्यांचा फलंदाजांचा क्रमही समजावून सांगितला. ‘श्रेयस, लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांचाच विचार आम्ही तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी करत होतो. पण, तीनही खेळाडू मधल्या काळात जायबंदी झाले आणि म्हणून फलंदाजीच्या क्रमाची चर्चा रंगली,’ द्रविड यांनी आपला मुद्दा समजावून सांगितला.
भारतीय संघ येत्या २ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध आशिया चषकातील आपला पहिला सामना खेळणार आहे. हा सामना श्रीलंकेत कँडी इथं होईल. आणि संघाचा पुढचा सामना ४ तारखेला नेपाळ विरुद्ध असेल.
हेही पहा-