Ranji Trophy 2025 : मुंबईचा रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश, हरयाणाचा केला १५२ धावांनी पराभव

Ranji Trophy 2025 : अजिंक्य रहाणेचं शतक, डायसचे ५ बळी हे मुंबईच्या दुसऱ्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं

36
Ranji Trophy 2025 : मुंबईचा रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश, हरयाणाचा केला १५२ धावांनी पराभव
Ranji Trophy 2025 : मुंबईचा रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश, हरयाणाचा केला १५२ धावांनी पराभव
  • ऋजुता लुकतुके

मुंबईने रणजी स्पर्धेत हरयाणाचा १५२ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या डावांत शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी केलेली भागिदारी आणि शार्दूलचे ६ बळी यांच्यामुळे मुंबईने १४ धावांची आघाडी घेतली होती. या कामगिरीवर अजिंक्य रहाणेचं शतक आणि रॉयस्टन डायसचे ५ बळी यांच्या कामगिरीने विजयाचा कळस चढवला. आणि चौथ्या दिवशीच मुंबईने ही लढत जिंकली. (Ranji Trophy 2025)

(हेही वाचा- POP Ganesha idols : पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार)

पहिल्या डावांत फक्त १४ धावांची आघाडी घेतल्यामुळे दुसऱ्या डावांत मुंबईला मोठ्या धावसंख्येची गरज होती. आणि ही हाक कर्णधार अजिंक्य रहाणेनं ऐकली. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मिळून रहाणेनं १८० चेंडू खेळून काढत १०८ धावा केल्या. त्याला सूर्यकुमार यादवने ७० आणि शिवम दुबेनं ४८ धावा करत चांगली साथ दिली. आणि त्याच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या डावांत सर्वबाद ३३९ धावा केल्या. चौथ्या दिवशी ४ बाद २२९ वरून मुंबईचा उर्वरित डाव १०४ धावांत संपला तेव्हाच खेळपट्टी धिमी झाल्याचा अंदाज आला होता. त्यामुळे विजयासाठी ३५३ धावांचं आव्हान हरयाणाला कठीणच जाणार होतं. पण, त्यांच्याकडे पाच अख्खी सत्रं शिल्लक होती. त्यामुळे सामन्याचा निकाल काहीही लागू शकत होता. पण, शार्दूल ठाकूरने अचूक सुरुवात करत हरयाणाला सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकललं. त्याच्या २६ धावांत ३ बळींमुळे हरयाणाचे सुरुवातीचे ५ गडी ६० धावांतच बाद झाले. पुढे सुमीत कुमार (६२) आणि लक्ष्य दलाल (६४) यांनी शतकी भागिदारी रचून हरयाणाचा डाव लांबवला. (Ranji Trophy 2025)

 पण, अशावेळी रहाणेनं तनुष कोटियनच्या हातात चेंडू सोपवला. आणि त्याने आपल्या पहिल्याच षटकात लक्ष्य दलालला बाद केलं. तिथून सामना पूर्णपणे मुंबईच्या हातात आला. रॉयस्टन डायसने तळाचे फलंदाज झटपट बाद करत ३९ धावांत ५ बळी मिळवले. आणि चौथ्या दिवशीच मुंबईने सामना जिंकला. एका दिवसांत दोन्ही संघांचे मिळून १६ फलंदाज बाद झाले. (Ranji Trophy 2025)

(हेही वाचा- Safer Internet Day निमित्त राज्यभर जनजागृती मोहीम)

दुसऱ्या डावांतील महत्त्वपूर्ण शतकासाठी अजिंक्य रहाणेला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. गेल्यावर्षी अजिंक्यच्याच नेतृत्वाखाली मुंबईने रणजी आणि इराणी चषक जिंकला होता. आता उपान्त्य फेरीत मुंबईची गाठ विदर्भ संघाशी पडणार आहे. येत्या १७ फेब्रुवारीला नागपूरच्या जामठा मैदानावर ही लढत रंगणार आहे. विदर्भानेही तामिळनाडूचा १९८ धावांनी मोठा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीची दुसरी लढत गुजरात विरुद्ध जम्मू व काश्मीर विरुद्ध केरळ या सामन्यातील विजेत्यांशी होणार आहे. (Ranji Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.