- ऋजुता लुकतुके
सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना बांगलादेशने ३ गडी राखून जिंकला. पण, या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनचा एक निर्णय वादग्रस्त ठरला. समरविक्रमा बाद झाल्यावर पुढील फलंदाज अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) वेळेवर फलंदाजीसाठी न उतरल्यामुळे त्याला टाईम्ड आऊट देण्यात आलं. अशा पद्धतीने बाद झालेला मॅथ्यूज हा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.
टाईम्ड आऊट हा प्रकार नियमावलीत आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये असे सात बळीही पूर्वी नोंदवले गेले आहेत. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं अपीलच कुठल्याही कर्णधाराने केलं नव्हतं. पण, यावेळी बांगलादेशी कर्णधार शकीब अल हसनने केलं. आणि नियमांचा आधार घेऊन मॅथ्यूजला बाद दिलं गेलं.
मॅथ्यूज (Angelo Mathews) हेलमेटचा स्ट्रॅप तुटल्यामुळे नवीन हेल्मेटसाठी सीमारेषेजवळ थांबला होता. पण, निर्धारित तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेल्यावर शकीबने अपील केलं. हा त्याचा अखिलाडूपणा झाल्याचा आरोप आता शकीबवर होतो आहे. खुद्द अँजेलो मॅथ्यूजही झाल्या प्रकारामुळे खूप चिडला.
(हेही वाचा Virat Kohli : विराटचा वाढदिवस ड्रेसिंग रुममध्ये ‘असा’ झाला साजरा)
मैदानातून डगआऊटमध्ये पोहोचल्यावर त्याने हेलमेट फेकत आपला राग व्यक्त केला. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रियाही येतायत.
🏏😔THIS is FIRST TIME in INTERNATIONAL CRICKET.
Bangladesh appealed against Angelo Mathews for timeout and he was given out. #SLvsBAN #BANvsSL #CWC23 pic.twitter.com/Dw7KBCdQN0
— 🇮🇳Bhanu (@singh_bhan33431) November 6, 2023
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीनुसार, एक फलंदाज बाद झाल्यावर किंवा निवृत्त झाल्यावर दुसरा फलंदाज पहिला चेंडू खेळेपर्यंत तीन मिनिटांचा अवधी मिळतो. विश्वचषक २०२३ साठी हा वेळ कमी करून २ मिनिटं निर्धारित करण्यात आला आहे. याच नियमावर शकीबने बोट ठेवलं.