-
ऋजुता लुकतुके
आगामी विजय हजारे स्पर्धेसाठी रिंकू सिंगकडे उत्तर प्रदेश संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारतीय संघात परतण्याच्या प्रयत्नांत असलेल्या रिंकूवर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाय तो अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गोलंदाजीवरही मेहनत घेत आहे. भुवनेश्वर कुमारकडून संघाच्या नेतृत्वाची धुरा रिंकू सिंगकडे आली आहे. मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तर प्रदेशचा उपउपान्त्य फेरीत पराभव झाला होता. (Rinku Singh)
(हेही वाचा- Ashwin Retires : अश्विनला निवृत्तीनंतर कुणी कुणी फोन केले? ट्विट करून दिली माहिती)
रिंकूवर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अलीकडेच युपी लीगमध्ये रिंकूने ९ सामन्यांमध्ये १६१ धावांच्या स्ट्राईकरेटने २१० धावा केल्या आहेत. ‘युपी मेव्हरिक संघाचं मी युपी लीगमध्ये नेतृत्व केलं. तो अनुभव खूपच चांगला होता. आणि मी बॅट आणि चेंडू असं दोन्ही योगदान संघासाठी दिलं. टी-२० क्रिकेटमध्ये सध्या अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व वाढत आहे. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. म्हणूनच मी आता गोलंदाजीवर मेहनत घेत आहे,’ असं रिंकूने बोलून दाखवलं. (Rinku Singh)
रिंकूसाठी येणारे दिवस महत्त्वाचे ठरू शकतात. कारण, कोलकाता फ्रँचाईजीने त्याला यंदा आपल्या ताफ्यात कायम राखलं आहे. आणि श्रेयस अय्यरला डच्चू दिल्यानंतर त्यांना संघाचा नवीन कर्णधार नेमायचा आहे. अशावेळी आगामी विजय हजारे चषकात रिंकूने चमक दाखवली तर तो कोलकातासाठी नैसर्गिक पर्याय आहे. कारण, कोलकाता फ्रँचाईजीकडून रिंकू सिंगने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. (Rinku Singh)
(हेही वाचा- Rupee vs Dollar : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? त्याचे काय फायदे, तोटे आहेत?)
भारतीय संघाकडून रिंकू सिंग २ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळला आहे. आणि टी-२० मध्ये त्याने ८० च्या सरासरीने ४१६ धावा केल्या आहेत. सहाव्या क्रमांकावर येऊन फटकेबाजी करण्यात तो माहीर आहे. आणि संघात या क्रमांकावर त्याची उपयुक्तताही मोठी आहे. टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघात त्याची निवड पक्की मानली जात होती. पण, अष्टपैलू खेळाडूंना संधी द्यायची या कारणास्तव रिंकूचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये झाला. त्यामुळे या हंगामात जोरदार तयारी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. (Rinku Singh)
तर विजय हजारे चषकातून चॅम्पियन्स करंडकाचे दरवाजेही त्याच्यासाठी खुले होऊ शकतात.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community