मणिपूर राज्यातील इम्फाल येथे घेण्यात आलेल्या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दादरच्या वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या रिया सुतार हिने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. रियाने 16 वर्षांखालील ज्युनियर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 80 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले आहे. त्यामुळे वीर सावरकर बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने रियाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
रियाला कांस्य पदक
16 वर्षीय रिया सुतार हिने 80 किलो वजनी गटात नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कडवी झुंज देत स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. उपांत्य फेरीतील सामन्यात रियाचा सामना आशियाई चॅम्पियन पुनियाशी झाला होता. पण तरीही रियाने पुनियासोबत चुरशीची झुंज दिली. तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले असले तरी ती खूप मेहनती मुलगी आहे. तिच्या वयानुसार तिचा कसलेला खेळ पाहता तिला भविष्यात चांगले यश मिळेल, असा विश्वास वीर सावरकर बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक राजन जोथाडिया यांनी व्यक्त केला आहे.
रिया सुतार ही वर्षभरापूर्वी वीर सावरकर बॉक्सिंग क्लबमध्ये सहभागी झाली. रिया ही राज्यस्तरीय चॅम्पियन असून, तिला नॅशनल चॅम्पियनशिपसाठी संधी मिळाली. या स्पर्धेत तिने मिळवलेले यश हे खरच उल्लेखनीय आहे, असेही जोथाडिया यांनी यावेळी म्हटले आहे.
रियाचे यश अभिमानास्पद
रियाला मिळालेले हे कांस्य पदक ही वीर सावरकर बॉक्सिंग क्लबसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या क्लबमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार करणं हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांचे स्वप्न आहे. दरवर्षी नॅशनल चॅम्पियनशिपसाठी वीर सावरकर बॉक्सिंग क्लबचे खेळाडू निवडले जातात. पण रियाने मेडलची कमाई केली आहे, ही आनंदाची बाब आहे, अशा शब्दांत राजन जोथाडिया यांनी रियाचे कौतुक केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर बॉक्सिंग क्लबचे खेळाडू
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून रिया सुतार आणि जागृती बोस या दोन तरुणींची निवड झाली होती. पण जागृतीला उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यात हरियाणाच्या बलाढ्य स्पर्धकाशी झुंज द्यावी लागली. तिने शर्थीने ही झुंज दिली पण तिला उपांत्य फेरी गाठता आली नाही. पण तरीही तिची कामगिरी कौतुकास्पद आहे, असेही जोथाडिया यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community