-
ऋजुता लुकतुके
मुंबईचा रणजी संघ गुरुवारुपासून जम्मू व काश्मीर संघाविरुद्ध आपला पुढचा सामना खेळणार आहे. या सामन्यात मुंबईच्या संघातून रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल आणि श्रेयस अय्यर हे सध्या भारतीय संघात असलेले खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनची मात्र ऐनवेळी धावपळ झाली आहे. हा सामना मुंबईत बीकेसी इथं असलेल्या शरद पवार क्रिकेट स्टेडिअमवर होणार आहे. आणि स्टार खेळाडू खेळणार असल्यामुळे इथं सामन्यासाठी चाहत्यांची गर्दी होईल अशी शक्यता आहे. अशावेळी एमसीएची धावपळ सुरू आहे ती चाहत्यांसाठी अतिरिक्त आसनांची व्यवस्था करण्याची. (Rohit Sharma)
‘खरंतर या मैदानावर आम्ही साधारणपणे १०० लोकांची बसण्याची व्यवस्था करतो. पण, रोहित, जयसवाल खेळणार असल्यामुळे आम्ही अतिरिक्त ५०० खुर्च्या इथं बसवणार आहोत. लोक नक्की येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण, विचारणा होत आहे. शिवाय सामन्यासाठीची सुरक्षा व्यवस्थाही आम्हाला वाढवावी लागेल. आंतरराष्ट्रीय सामन्यासारखी व्यवस्था इथं असेल,’ असं एमसीएकडून सांगण्यात येत आहे. (Rohit Sharma)
एमसीएचं बीकेसीमधील हे मैदान फक्त रणजी सामने भरवतं. त्यामुळे इथं आसन व्यवस्था मोठी नाही. शिवाय हा सामना जिओ सिनेमावरही दाखवला जाणार आहे. त्यामुळे चाहते ओटीटी किंवा मोबाईलवरही हा सामना पाहू शकतील. (Rohit Sharma)
(हेही वाचा- १६ मंत्र्यांना अद्याप Personal Assistant ची प्रतीक्षा; कामात नक्की काय येत आहेत अडचणी ?)
दरम्यान, मुंबई असोसिएशनकडून ताफ्यातील दोन पंचांच्या सत्काराचा कार्यक्रमही लवकरच होणार आहे. नितीन मेमन हे भारताचे पंच इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेत आपला ५० वा सामना पंच म्हणून खेळणार आहेत. सध्या आयसीसीच्या पॅनलमधले ते एकमेव भारतीय पंच आहेत. आणि भारताकडून ५० टी-२० सामन्यांचा मापदंड पार करणारे ते पहिले भारतीय पंच असतील. त्यामुळे त्यांचा सत्कार या मालिकेदरम्यानच्या मुंबईत होणाऱ्या सामन्यात करण्याचा एमसीएचा विचार आहे. तसंच मुंबईकर अनिल दांडेकरही प्रथमश्रेणी क्रिकेटमधील आपला शंभरावा सामना खेळणार आहेत. या दोघांचा एकत्र सत्कार करण्याचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा विचार आहे. (Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community