Rohit Sharma : रोहित शर्मा आयपॅड कुठेही विसरतो. पण, ‘ही’ गोष्ट सामन्यापूर्वी विसरत नाही!

रोहित शर्मा त्याच्या वेंधळेपणासाठी ड्रेसिंग रुममध्ये ओळखला जातो.

114
Rohit Sharma : रोहित शर्मा आयपॅड कुठेही विसरतो. पण, ‘ही’ गोष्ट सामन्यापूर्वी विसरत नाही!
Rohit Sharma : रोहित शर्मा आयपॅड कुठेही विसरतो. पण, ‘ही’ गोष्ट सामन्यापूर्वी विसरत नाही!
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी फलंदाजीचा प्रशिक्षक विक्रम राठोडने अलीकडेच एका मुलाखतीत रोहित शर्माची (Rohit Sharma) मैदानावरील रणनीती आणि ती राबवण्यातील काटेकोरपणा याला मुक्त हस्ताने दाद दिली. याआधी रोहितचा साथीदार विराट कोहलीने अशाच एका कार्यक्रमात रोहित वेंधळा असल्याचे किस्से सांगितले होते. तो परदेश दौऱ्यातही अनेकदा आपला आयपॅड विसरतो, वस्तू कुठे ठेवल्यात याचं त्याला भान नसतं, काहीवेळा निवडलेला संघही त्याला नाणेफेकीला जाईपर्यंत विसरायला होतो, असे भन्नाट किस्से विराटने सांगितले होते. आणि अशा वागण्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये रोहितची नेहमी चेष्टा होते, असंही विराट म्हणाला होता.

याच किश्शांना जोडून विक्रम राठोड यांनी रोहितचा आणखी एक स्वभाव सांगितला. ‘रोहित कुठेही आयपॅड किंवा इतर वस्तू विसरतो, हे खरंच आहे. आणि त्यासाठी सगळे त्याला चिडवतात. पण, एका बाबतीत रोहित अगदी चोख आहे. आणि ती म्हणजे मैदानावर आखायची रणनीती. ती त्याला पक्की ठाऊक असते. आणि मुंबईकर क्रिकेटपटूमध्ये असलेला खडूसपणाही त्याच्यात पुरेपूर आहे,’ असं विक्रम राठोड एका खाजगी पॉडकास्टवर बोलताना म्हणाला.

(हेही वाचा – Kolkata Murder Case : आरोपीची पॉलीग्राफ टेस्ट करण्यास न्यायालयाची सीबीआयला परवानगी)

रोहितचं आणखी एक वैशिष्ट्य सांगताना विक्रम म्हणाला की, ‘रोहित हा खेळाडूंचा नेता आहे. त्याने खेळाडूंबरोबर बराच वेळ घालवला आहे. त्यांना समजून घेतलं आहे. आणि त्यांच्यावर बराच वेळ खर्च केला आहे. त्याचं फळ त्याला नेतृत्व करताना मिळतं. तो हक्काने एखादी गोष्ट खेळाडूला सांगू शकतो. त्यांच्या पालकांशी चांगला संवाद साधतो.’

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत शेवटच्या टप्प्यात गोलंदाजीत केलेले बदल हे रोहितने स्वयंस्फूर्तीने घेतलेले होते. आणि बुमराहचा चार षटकांचा कोटा आधीच संपवून मग त्याने अंतिम षटक हार्दिककडे दिलं हा निर्णयही त्यानेच घेतलेला होता असं विक्रमने सांगितलं. आणि त्याचा संघाला कसा फायदा झाला ते सांगताना तो म्हणतो, ‘बुमराहने त्याच्या शेवटच्या षटकात अवघी एक धाव दिली. अर्शदीपचं षटकही चांगलं पडलं. त्यामुळे आफ्रिकन संघाला शेवटच्या षटकात १६ धावा हव्या होत्या. हे आव्हान कठीणच असणार होतं. तिथपर्यंत रोहितच्या रणनीतीमुळे त्यांना आणलं,’ असं विक्रम राठोडला वाटतं.

टी-२० विश्वचषकातील विजेतेपदानंतर रोहित शर्माने टी-२० प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.