- ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीकडे स्टार खेळाडूंची मांदियाळी आहे. अशावेळी ते नेमकं कुणाला कायम ठेवणार आणि त्यासाठी किती पैसे मोजणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण, अखेर मुंबईने सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवलं. फ्रँचाईजीचे मालक आकाश अंबानी यांनी या निर्णयानंतर, ‘पाच बोटं, एक मूठ,’ असं या रणनीतीचं वर्णन केलं. हे खरं असलं तरी खेळाडूंना कायम ठेवताना प्राधान्यक्रमही महत्त्वाचा असतो. कारण, त्यावरून खेळाडूची किंमत ठरते. तो निकष पाहिला तर मुंबई इंडियन्सनी रोहित शर्माला जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या नंतर चौथं स्थान दिलं आहे. पाचव्या स्थानावर नवखा तिलक वर्मा आहे. म्हणजेच रोहित शर्मा मुंबईसाठी पहिल्या तीन पसंतीचा खेळाडू नव्हता असं आता समोर आलं आहे.
पण, त्यावरही रोहितने (Rohit Sharma) शांतपणे आपलं उत्तर दिलं आहे. ‘मी टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालो आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असलेल्या खेळाडूंनंतरचा क्रमांक मला मिळावा हेच योग्य आहे. मला त्याविषयी काही वाटत नाही. चौथा क्रमांकच माझ्यासाठी योग्य आहे. मला तरी असंच वाटतं. मेगा लिलावापूर्वी कुठले खेळाडू कायम ठेवायचे याची रणनीती आखणं खूप महत्त्वाचं आहे,’ असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
(हेही वाचा – Delhi Pollution: दिल्लीत बंदी असतानाही फोडले फटाके; प्रदुषणाचा पारा AQI ४०० पार)
यंदाचा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी विसरण्यासारखाच होता. संघ गुणतालिकेत तळाला राहिला. तर संघाच्या कर्णधार बदलावरूनही चाहत्यांमध्ये गदारोळ झाला. मुंबई इंडियन्स प्रशासनाने हंगाम सुरू होण्याआधी काही दिवस आधी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार केलं. हार्दिक पांड्या गुजरातकडून लिलावाबाहेरच्या सौद्यातून संघात आला होता. रोहित (Rohit Sharma) हा मुंबई फ्रँचाईजीच्या चाहत्यांचा लाडका होता. त्यामुळे हा बदल चाहत्यांना अजिबात रुचला नाही. त्यामुळे हार्दिकची अनेक मैदानांवर हूर्यो उडवली गेली.
‘मागचा हंगाम खराब गेला असला तरी मुंबई प्रशासन आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवण्यावर विश्वास ठेवते. या खेळाडूंच्या भोवती अकरा खेळाडू आणि अख्खा संघ यांचा डोलारा उभा राहू शकतो. आताही आमची रणनीती तीच होती. कर्णधार म्हणूनही आम्ही हार्दिकला कायम ठेवलं आहे. आता पुढील हंगामात योग्य पावलं टाकत आम्ही नक्की पुनरागमन करू,’ असं मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीचे मालक आकाश अंबानी यांनी म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community