ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेट संघासाठी पुढील हंगाम हा १० कसोटी सामन्यांचा आहे. आणि यशाची टक्केवारी ६० टक्क्यांच्या वर ठेवून भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचीही संधी आहे. यातील पहिल्या ५ कसोटी मायदेशात आणि उर्वरित ५ कसोटी ऑस्ट्रेलियात खेळायच्या आहेत. अशावेळी भारतीय संघही या आव्हानासाठी जोरदार तयारी चेन्नईत करत आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एक सोडून तीन विक्रमांच्या उंबरठ्यावर उभा आहे.
(हेही वाचा – Wrestling Champions Super League : साक्षी व अमन सेहरावतच्या पुढाकाराने भारतात कुस्ती लीगच्या आयोजनाची तयारी )
मनाप्रमाणे षटकार ठोकणे ही रोहितची खासियत आहे. आणि कसोटी क्रिकेटमध्ये षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सध्या तो अकराव्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात सध्या ८४ कसोटी षटकार आहेत. आणखी ७ षटकार ठोकल्यावर तो विरेंद्र सेहवागला या बाबतीत मागे टाकेल. विशेष म्हणजे भारतीय संघात दोघांची जागा सारखीच म्हणजेच सलामीवीराची आहे. सेहवागला मागे टाकून भारतातील सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज होण्याची रोहीतला संधी आहे.
इतकंच नाही तर रोहितच्या नावावर सध्या ४८ आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. आणि आणखी दोन शतकांसह तो शतकांचं अर्धशतक पूर्ण करू शकतो. ही कामगिरी करून तो भारतातील फक्त तिसरा फलंदाज ठरू शकतो, ज्यांच्या नावावर ५० पेक्षा जास्त शतकं असतील. फक्त मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर (१००) आणि विराट कोहली (८०) हे रोहितच्या पुढे आहेत. तर जागतिक स्तरावर ५० शतकं पूर्ण करणारा तो फक्त अकरावा फलंदाज असेल.
भारतीय संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भारतात ५ कसोटी खेळणार आहे. तर नोव्हेंबर पासून भारताचा बहुचर्चित ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार असून तिथे भारतीय संघ ५ कसोटी खेळणार आहे. आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. (Rohit Sharma)