सचिन तेंडुलकर… पहायला गेलं तर आडनावाच्या शेवटी ‘कर’ असणारी असंख्य माणसं या जगाच्या पाठीवर आहेत. पण त्यापैकी सचिनसारखे हाताच्या दहा बोटांवर मोजण्याइतके मोजकेच कर्तृत्ववान तेंडुलकर असतात. 21व्या शतकात शतकांचं शतक ठोकून विश्वविक्रम करणारं सचिनसारखं व्यक्तिमत्त्व शतकातून एकदाच जन्माला येतं. असा चमत्कार क्वचितच कोणाला तरी घडवता येतो आणि तो माणूस आपल्यासाठी ‘देव’ होऊन जातो.
तर असा हा क्रिकेटचा देव आता 49 वर्षांचा झाला आहे. सचिनने क्रिकेटमधील आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत खऱ्या अर्थानं मैदान मारलं. त्याची मैदानातली चौफेर फटकेबाजी आजही आपल्या डोळ्यासमोर येते. कारण त्याची प्रत्येक खेळी ही स्कोरबोर्डवरील धावसंख्येप्रमाणेच प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या मनात कोरली गेली आहे. सचिनने 100 शतकं करुन क्रिकेट जगतात अनंत काळापर्यंत आपलं अढळ स्थान निर्माण केलंच आहे.
जेव्हा सचिनचं शतक थोडक्यात हुकलं तेव्हा त्याच्यापेक्षाही आपल्याला जास्त दुःख झालं. पण जेव्हा सचिन अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे शतकाला मुकला, तेव्हा ‘खोटा आऊट’ दिला म्हणत, आपण अंपायरच्या कुळाचा उद्धार केला. त्यावेळी डीआरएस सिस्टीम अस्तित्वात नसल्याने सचिनला माघारी परतावे लागले होते. एका माणसाची चूक ही कधीकधी दुसऱ्याला भोगावी लागते, पण सचिनच्या बाबतीत माणसांकडून झालेल्या या चुका देवाला भोगाव्या लागल्या आहेत, असं म्हटलं तर त्यात काही चुकीचं नाही.
एकदा-दोनदा नाही तर तब्बल 29 वेळा सचिन अंपायरच्या चुकीच्या निर्णयांचा बळी ठरला आहे. पण यातील दोन असे निर्णय आहेत ज्याने सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीमधील दोन शतकं कमी झाली. कुठल्या होत्या त्या दोन इनिंग्स?
भारत विरुद्ध इंग्लंड नॉटिंगहॅम टेस्ट (27 ते 31 जुलै 2007)
भारताच्या इंग्लंड दौ-यातील या दुस-या टेस्ट मॅचमध्ये भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये सचिनने उल्लेखनीय कामगिरी केली. 12 चौकारांच्या जोरावर सचिनने या कसोटीत 197 चेंडूत 91 धावा केल्या. त्यामुळे यावेळी सचिनच्या चाहत्यांना त्याच्या शतकाचे वेध लागले होते. पण त्याच वेळी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू 108वी ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याने सचिनला टाकलेला चेंडू सचिनच्या पायाला लागला आणि त्याला ऑस्ट्रेलियन अंपायर सायमन टॉफल यांनी पायचीत घोषित केले. त्यावेळी सचिनलाही त्यांच्या या निर्णयाचं आश्चर्य वाटलं होतं. धक्कादायक म्हणजे याच वर्षी टॉफल यांना आयसीसीचा सर्वोत्कृष्ट अंपायरचा सलग तिसरा पुरस्कार देण्यात आला होता.
भारत विरुद्ध इंग्लंड ब्रिस्टॉल वन-डे (24 ऑगस्ट 2007)
याच इंग्लंड दौ-यावरील दुस-या वनडेमध्ये सुद्धा सचिनला अशाच एका चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. पण हा निर्णय तमाम क्रिकेट प्रेमींच्या जिव्हारी लागणारा होता. कारण त्यावेळी सचिन आपल्या शतकापासून केवळ 1 धाव मागे होता. इंग्लंडचा गोलंदाज अँड्र्यू फ्लिंटॉफ 32 ओव्हर टाकण्यासाठी आला, त्यावेळी सचिन 112 चेंडूंत 99 धावांवर खेळत होता. यावेळी सचिनने फ्लिंटॉफचा बाऊंसर चुकवला आणि चेंडू विकेटकीपरच्या हातात गेला. पण तरीही इंग्लंडचे अंपायर इयान गोल्ड यांनी सचिनला आऊट घोषित केले. त्यावेळी सचिनने व्यक्त केलेल्या भावना सारं काही सांगत होत्या. पण तरीही त्याने कुठलीही हुज्जत न घालता पॅव्हेलियनची वाट धरली.
(ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला सचिनच्या एखाद्या खेळीचा किस्सा आठवत असेल, तर तो ही शेअर करा.)