ऋजुता लुकतुके
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीतून संपूर्णपणे सावरला आहे का असा प्रश्न आता पडला आहे. कारण, आशिया चषकासाठीच्या संघात परतल्यावर तो सुरुवातीला नेपाळ आणि पाकिस्तानविरुद्धचे साखळी सामने खेळला. पण, नंतर सुपर ४च्या दोन्ही लढतीत पुन्हा पाठ दुखावल्यामुळे तो खेळू शकलेला नाही. शुक्रवारी होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही तो खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे एकूणच श्रेयसच्या तंदुरुस्तीवर पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.
आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका भारतीय संघ खेळणार आहे. आणि त्यासाठीची संघ निवडही या आठवड्यात अपेक्षित आहे. आणि त्यासाठी श्रेयस उपलब्ध आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही. गुरुवारी भारतीय संघ सरावासाठी मैदानात उतरेल, तेव्हाच श्रेयसच्या तंदुरुस्तीविषयी कळू शकेल. त्याला सध्या झालेली दुखापत फारशी गंभीर नसून पाठीला आलेला ताठरपणा आहे, असं काहींचं म्हणणं आहे.
श्रीलंकेविरुद्धचा सामना श्रेयस खेळला नाही तेव्हा बीसीसीआयने एक अधिकृत पत्रक काढलं होतं. ‘श्रेयसची पाठदुखी बरी होत आहे. पण, विश्रांती मिळावी म्हणून लंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळवण्यात आलं नाही. तो संघाबरोबर स्टेडिअममध्येही नव्हता,’ असं या पत्रकात म्हटलं होतं. संघाबरोबर असलेलं वैद्यकीय पथक श्रेयसच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असल्याचंही या पत्रकात म्हटलं होतं.
UPDATE – Shreyas Iyer is feeling better but is yet to fully recover from back spasm. He has been adviced rest by the BCCI Medical Team and has not travelled with the team to the stadium today for India’s Super 4 match against Sri Lanka.#AsiaCup2023 pic.twitter.com/q6yyRbVchj
— BCCI (@BCCI) September 12, 2023
पण, श्रेयसच्या तंदुरुस्तीचा प्रश्न इतक्यात सुटत नाही. कारण, दुखापतीमुळे आणि पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे तो आधीच जवळ जवळ एक वर्षं क्रिकेटपासून दूर आहे. त्यात खेळलेल्या पहिल्याच सामन्यात पुन्हा पाठदुखी उद्भवल्यामुळे पुढचे दोन सामने तो खेळू शकलेला नाही. आणि आता बांगलादेश विरुद्धही तो खेळला नाही, तर एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सरावाच्या फारशा संधी त्याच्यापाशी नाहीत. कारण, ऑक्टोबरच्या ८ तारखेला भारतीय संघ विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळणार आहे. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याला खेळवायचं की नाही याचा निर्णय निवड समितीला आता घ्यावा लागेल.
क्रिकेट अकॅडमीत श्रेयसबरोबर असलेला के एल राहुल मात्र दुखापतीतून चांगलाच सावरला आहे. आणि पाकिस्तानविरुद्ध शकत ठोकून त्याने आपला फॉर्मही दाखवून दिला आहे. श्रेयसच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर मिळालेल्या संधीचा तो चांगला फायदा उचलत आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community