- ऋजुता लुकतुके
मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची आशिया चषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे १० महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेला श्रेयस स्पर्धेपूर्वी वेळेत तंदुरुस्त झाल्यामुळे त्याने नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे आभार मानले आहेत. सोमवारी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आगामी आशिया चषकासाठी १७ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली. यात दुखापतीतून सावरलेले के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचाही समावेश आहे. दोघांच्या तंदुरुस्तीविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती. खासकरून श्रेयस अय्यर १०० टक्के मॅचफिट असेल का अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या.
पण, तंदुरुस्तीचं आव्हान पार करून संघातील निवड शक्य झाल्यामुळे श्रेयसने सर्वात आधी त्याच्या तंदुरुस्तीवर मेहनत घेणाऱ्या बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकॅडमीतील प्रशिक्षकांचे आभार मानले आहेत. मार्च महिन्यातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर श्रेयस पाठीच्या दुखण्यामुळे बेजार होता. संघात निवड झाल्यानंतर त्याने लिहिलेल्या एका ट्विटर पोस्टमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘प्रवास खूप लांबचा होता. पण, या काळात माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नितीन भाई रजनीसर तसंच इतर नॅशनल अकॅडमीतील सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. माझ्या तंदुरुस्तीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांचेच आभार,’ अशी एक पोस्टच श्रेयसने मायक्रोब्लॉगिंग साईटवर टाकली आहे.
Been a long journey but I’m super grateful to the people who stood by my side to help me to get where I am today. Thank you Nitin bhai and Rajini sir and everyone at The NCA, who’ve been tirelessly helping me. Much love and much appreciated 🙏 pic.twitter.com/i6YEAV8u8r
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) August 23, 2023
(हेही वाचा – Zika Virus : मुंबईत झिका व्हायरसचा शिरकाव, वाचा कुठे घडली घटना)
श्रेयस अय्यर सह के एल राहुलही बंगळुरूमध्येच आपल्या दुखापतीवर उपचार करून घेत होता. आणि दोघांचाही भारतीय संघात समावेश झाला आहे. अलीकडेच भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माने श्रेयस अय्यरचं संघातील महत्त्व सांगताना चौथ्या क्रमांकावरील भरवशाचा खेळाडू म्हणून त्याचं नाव घेतलं होतं.
श्रेयसने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३७ सामन्यांमध्ये दीड हजारच्या वर धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय सामन्यांत श्रेयसच्या नावावर १० कसोटी आणि ४२ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव जमा आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रेयसने ४४.४० च्या सरासरीने १,६३१ धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतकं आणि १४ अर्धशतकं ठोकली आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर १ शतक आणि ५ अर्धशतकं आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community