- ऋजुता लुकतुके
वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकलेला शुभमन गिल आयसीसी क्रमवारीतही चमकतोय. सातव्या स्थानावरून त्याने पाचव्या स्थानावर झेप घेतलीय. आणि हे त्याचं सर्वोत्तम रँकिंग आहे. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल आयपीएलपासून खोऱ्याने धावा करतोय. आताच्या विंडिज दौऱ्यातही एकदिवसीय मालिका त्याने गाजवली. आणि त्याच्याच जोरावर आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
पाकिस्तानचे बाबर आझम, फकर झमान आणि इमाम उल हक यांनी मात्र क्रमवारीतलं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. शुभमनचे रेटिंग पॉइंट्स आता ७४३ वर पोहोचले आहेत. आणि फखर (७५५) आणि इमाम (७४५) यांच्या तो खूप जवळ आहे. बाबर आझम मात्र सध्या प्रथम क्रमांकावर शड्डू ठोकून आहे. विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शुभमनने तीन डावांमध्ये त्याने अनुक्रमे ७,३४ आणि ८५ धावा केल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचा एक विक्रमही मोडला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या २६ डावांमध्ये सर्वाधिक १,२३२ धावांचा बाबर आझमचा विक्रम होता. शुभमनने इतक्याच डावांमध्ये १,२५२ धावा केल्या आहेत.
(हेही वाचा – Onion Price Hike : टोमॅटोनंतर आता कांदाही महागणार; एका किलोमागे ‘इतके’ रुपये वाढणार)
गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने प्रथमच पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवलं आहे. तो सध्या दहाव्या स्थानावर आहे. तर शार्दुल ठाकूरनेही चांगली मजल मारली आहे. टी-२० मालिकेत भारताकडून यशस्वी जयसवाल आणि तिलक वर्मा यांनी पदार्पण केलं. यापैकी तिलक वर्मा दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे ५१ आणि नाबाद ४९ धावा करून लक्षवेधी ठरला. या कामगिरीच्या जोरावर त्याने टी-२० प्रकारात फलंदाजांच्या क्रमवारीत चांगली सुरुवात केली आहे.
दोन सामन्यातच तो थेट ४०व्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीची ताजी क्रमवारी तुम्ही या वेबसाईटवर पाहू शकता. (https://www.icc-cricket.com/rankings/mens/overview) ताज्या क्रमवारीत टी-२० प्रकारात भारतीय संघ २६४ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघ ११८ रेटिंग गुणांसह अव्वल आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विंडिज विरुद्धच्या मालिकेनंतर भारताने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलं आहे. भारताचे ११८ रेटिंग गुण आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community