Shubman Gill : ‘माझ्यावर खूप सारं दडपण आहे,’ असं शुभमन गिल का म्हणाला?

47
Shubman Gill : ‘माझ्यावर खूप सारं दडपण आहे,’ असं शुभमन गिल का म्हणाला?
Shubman Gill : ‘माझ्यावर खूप सारं दडपण आहे,’ असं शुभमन गिल का म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात शुभमन गिलने पंजाबकडून खेळताना कर्नाटकविरुद्ध दुसऱ्या डावांत शतक झळकावलं. या कामगिरीमुळे तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. पण, ऑस्ट्रेलियातील अपयश काही प्रमाणात धुवून निघालं आहे. आणि फॉर्ममध्ये परतल्याची ग्वाहीही त्याने दिली आहे. पण, त्याचवेळी ‘आपल्यावर शतकासाठी खूप मोठं दडपण होतं,’ असंही या युवा फलंदाजाने बोलून दाखवलं आहे. (Shubman Gill)

‘लाल चेंडूवर खेळताना कामगिरी चांगली झाली नाहीए हे खरं आहे. मी २५-३० धावा करेपर्यंत बरा असतो. त्यानंतर मी स्वत:वरच मोठा डाव खेळण्यासाठी अतिरिक्त दडपण टाकतो, असं मला वाटतं. त्यामुळे मग खेळही घसरतो आहे. मी खरंतर अशा प्रकारचं क्रिकेट खेळून मोठा झालेलो नाही. माझा टिच्चून खेळण्यावर विश्वास आहे. पण, काहीतरी चुकतंय हे नक्की,’ असं गिलने प्रांजळपणे कबूल केलं. (Shubman Gill)

(हेही वाचा- केंद्रीय मंत्री Amit Shah महाकुंभमेळ्यात होणार सहभागी; संगमावर करणार स्नान)

जास्तीचा विचार केल्यामुळे कधी कधी ही अवस्था झाल्याचंही गिलला वाटतं. ‘काही वेळा आपण मनाच्या एका वेगळ्या अवस्थेत असतो. अशावेळी आपण स्वत:वरच जास्त दडपण आणतो. धावांचा अती विचार करत बसतो. आणि मग हातून बेसावधपणे चुका होतात. तसंच माझं झालं होतं. एकदा खेळपट्टीवर स्थिरावलो की, मी स्वत:ला बजावायचो, आता मोठी खेळी झालीच पाहिजे. आणि तिथेच सगळं बिघडायचं,’ असं गिलने बोलून दाखवलं आहे. (Shubman Gill)

शैलीदार आघाडीचा फलंदाज गिल पहिल्या डावांत ४ धावांवरच बाद झाला होता. पण, दुसऱ्या डावांत मात्र त्याने सुरुवातीला सावध खेळ केला. आणि त्यानंतर फटकेबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. ‘दुसऱ्या बाजूने साथीदार बाद होत होते. त्यामुळे पहिल्या १३० चेंडूंमध्ये माझ्या फक्त ४० धावा झाल्या. पण, त्यानंतर संघाच्या धावा वाढणंही महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी माझे फटके खेळायला सुरुवात केली. आणि त्यात मला यश आलं. रणजीमुळे मला सामन्याचा अनुभव मिळाला, हे चांगलं झालं. सरावाने मदत नक्की होते. पण, सामन्याचा सराव स्पर्धात्मक असतो. त्याचा नक्कीच फायदा झाला,’ असं गिल सामन्यानंतर म्हणाला. (Shubman Gill)

(हेही वाचा- Mumbai Ranji Trophy Chances : जम्मू व काश्मीरबरोबरच्या पराभवानंतरही मुंबई बाद फेरी गाठू शकते का?)

शुभमन गिल २०२२-२३ या कालावधीत भारताचा उगवता आघाडीचा खेळाडू होता आणि आहे. पण, अलीकडे हरवलेला फॉर्म आणि सलामीला यशस्वी जयसवालने मारलेल्या मुसंडीमुळे अंतिम अकरांमध्ये स्थान मिळवतानाही गिलला स्पर्धा करावी लागत आहे. (Shubman Gill)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.