Asian Games : एशियन गेम्स विजेत्यांना ‘युपी’ सरकारने भरभरून दिले; महाराष्ट्रातील खेळाडू मात्र उपेक्षित

उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील पदक विजेत्यांना तब्बल ३ कोटींचे बक्षिस आणि पोलीस उप-अधिक्षक पदाची नोकरी देऊ केली.

182
Asian Games : एशियन गेम्स विजेत्यांना 'युपी' सरकारने भरभरून दिले; महाराष्ट्रातील खेळाडू मात्र उपेक्षित
Asian Games : एशियन गेम्स विजेत्यांना 'युपी' सरकारने भरभरून दिले; महाराष्ट्रातील खेळाडू मात्र उपेक्षित

एशियन गेम्स स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे देशभरात कौतुक सुरू असताना, महाराष्ट्र सरकार मात्र याबाबतीत उदासिन असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील पदक विजेत्यांना तब्बल ३ कोटींचे बक्षिस आणि पोलीस उप-अधिक्षक पदाची नोकरी देऊ केली. याऊलट महाराष्ट्रातील ३१ खेळाडूंनी एशियन गेम्समध्ये पदकांची लयलूट केली असताना, त्यांच्यासाठी राज्य शासनाने कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या या उदासिनतेबाबत क्रीडा प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (Asian Games)

एशियन गेम्स ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची पाल्य संस्था असलेली आशिया ऑलिंपिक समिती या स्पर्धेचे आयोजन करते. ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियन गेम्स ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. आशिया खंडातील ४५ देश या स्पर्धेत सहभाग घेतात. यंदा हांगझोऊ येथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताने २८ सुवर्ण, २८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांसह एकूण १०७ पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे त्यातील ३१ पदक विजेते एकट्या महाराष्ट्रातील आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने त्यांच्या बहुमानाकरिता कोणतीही घोषणा केलेली नाही. (Asian Games)

याऊलट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील पदक विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसे जाहीर केली आहेत. एशियन गेम्स स्पर्धेत पदक जिंकलेल्या उत्तर प्रदेशमधील खेळाडूंना प्रत्येकी ३ कोटींचे बक्षिस आणि पोलीस उप-अधिक्षक पदाची नोकरी दिली जाईल, अशी घोषणा आदित्यनाथ यांनी केली. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्र सरकारही आपल्या राज्यातील खेळाडूंसाठी बक्षिस जाहीर करेल, अशी अपेक्षा क्रीडा प्रेमींना होती. मात्र, शिंदे-फडणवीस-पवार सरकार याबाबतीत उदासिन असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (Asian Games)

(हेही वाचा – India- Srilanka ferry : भारत – श्रीलंका दरम्यान नवीन फ़ेरीचा मोदींच्या हस्ते शुभारंभ)

दरम्यान, एशियन गेम्समध्ये पदके मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारकडून १ लाख रुपये दिले जातात. त्याउपर बक्षिस द्यायचे झाल्यास त्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने क्रीडा मंत्री घेत असतात, अशी माहिती क्रीडा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली. (Asian Games)

एकनाथ शिंदेंनी भेट नाकारली

एशियन गेम्समध्ये रौप्य पदक जिंकणारी मुंबईची धावपटू ऐश्वर्या मिश्रा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी नुकतीच वर्षा बंगल्यावर दाखल झाली. महाराष्ट्राची कन्या म्हणून मुख्यमंत्री आपले कौतुक करतील, अशी अपेक्षा तिला होती. मात्र, तिचा अपेक्षाभंग झाला. आजारी असल्याचे कारण देत मुख्यमंत्री कार्यालयाकडून भेट नाकारण्यात आली. त्यामुळे तिने माध्यमांसमोर येत नाराजी व्यक्त केली. (Asian Games)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.