मालदीवच्या माफुशी बेटावर सुरू असलेल्या 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी दाखवली. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चार सुवर्ण पदकांची जबरदस्त कमाई केल्यामुळे मालदीवमध्ये अर्ध्या अर्ध्या तासाच्या फरकाने ”जन गण मन”चे सूर घूमले. नवी मुंबईच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी यांनी अभिमानास्पद कामगिरी करताना, मास्टर्स शरीरसौष्ठवाच्या गटात आशिया श्रीचा बहुमान पटकावून इतिहास रचला. तसेच दिव्यांगाच्या गटात के. सुरेश, ज्यूनियर गटात (75 किलो) सुरेश बालाकुमार, स्पोर्टस् फिजीक प्रकारात अथुल कृष्णा यांनी सोनेरी यश संपादन केले.
मालदीवमध्ये सुरू झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वात मोठा आणि बलाढ्य संघ भारताचाच असल्यामुळे माफुशी बेटावर भारतीय खेळाडूंचे वादळ घोंघावणार हे स्पष्ट होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेही तसेच. माफुशी बेटावर वादळी वाऱ्याचे आगमन झाल्यामुळे, आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र मालदीव शरीरसौष्ठव संघटनेने तासाभरात नव्या आयोजन स्थळाची व्यवस्था केली. ज्यात अकरा गटाच्या स्पर्धा खेळवल्या गेल्या. वादळी वा-यासह सुरू झालेल्या या स्पर्धेच्या प्रारंभापासून भारतीय खेळाडूंनीही वादळी कामगिरीचा धडाका दिला. दिव्यांगाच्या पहिल्याच गटात सोनंच नव्हे तर रौप्य आणि कांस्यपदकही भारतीयांनी जिंकले. के. सुरेशने सुवर्ण कामगिरी करत, भारताचे सुवर्ण पदकाचे खाते उघडले.
( हेही वाचा: “जे होईल ते पाहून घेऊ,अमित शहा यांचा आमच्यावरही दबाव” राऊतांचा खळबळजनक दावा )
सुभाष पुजारींनी सुवर्ण पदक महाराष्ट्र पोलीस दलाला केले अर्पण
नवी मुंबईच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून सेवेत असलेल्या सुभाष पुजारी यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचे पदक रोवले, पण यावेळी पदकाचा रंग सोनेरी होता. मास्टर्स आशियाई श्री च्या 80 किलो वजनी गटात मलेशिया आणि व्हिएतनामच्या तगड्या खेळाडूंवर मात करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याआधी व्हिएतनाम येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत त्यांना कांस्यपदक मिळाले होते. आज त्या कामगिरीवर मात करत त्यांनी सोनेरी इतिहास रचला. पुजारींनी आपल्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आपले सुवर्ण महाराष्ट्र पोलीस दल, आपले वरिष्ठ अधिका-यांना अर्पण केला. त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे, प्रेमामुळेच मी इथवर पोहोचलो. आता माझे पुढचे लक्ष्य जागतिक स्पर्धेत याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची असेल, असे सुभाष म्हणाले.