भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) नाराज झाले. त्यापाठोपाठ श्रीलंका क्रिकेट बोर्ड व बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही आशिया चषक पाकिस्तानातून बाहेर खेळवावा अशी मागणी केली. त्यामुळे ही स्पर्धा आता श्रीलंकेत होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. आशियाई क्रिकेट परिषद ( ACC) लवकरच याबाबत अधिकृत घोषणा या महिन्याच्या अखेरीस केली जाण्याची शक्यता आहे. पण, यामुळे पाकिस्तान या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आशिया चषक पाकिस्तानात व्हावा यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जंगजंग पछाडले. पण, बीसीसीआयने पाकिस्तानात संघ पाठवण्यास नकार दिला आणि त्यांना अन्य सदस्यांचाही पाठींबा मिळाला. PCB ने हायब्रिड मॉडेल स्वरूपात स्पर्धा खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता, ज्यानुसार भारताचे सामने दुबईत होतील आणि अन्य संघ पाकिस्तानात खेळतील. पण, त्याला ब्रॉडकास्टरने विरोध दर्शवला. त्यात सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे प्रचंड ऊन असल्याने तेथे वन डे सामने खेळणे शक्य नाही. वन डे वर्ल्ड कप २०२३ डोळ्यासमोर ठेवून यंदाची आशिया चषक ५०-५० षटकांचा खेळवण्यात येणार आहे. ओमानला ही स्पर्धा आयोजनाची ऑफर दिली होती, परंतु भौतिक परिस्थिती लक्षात घेता श्रीलंकेत ही स्पर्धा होण्याची शक्यता अधिक आहे. २०१८मध्ये दुबईत सप्टेंबर महिन्यात आशिया चषक झाला होता आणि तेव्हा खेळाडूंचा कस लागला होता. याच स्पर्धेत हार्दिक पांड्या जखमी होऊन मैदानाबाहेर गेला होता आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या वर्ल्ड कपला मुकला होता. पण, यंदाची स्पर्धा श्रीलंकेला झाल्यास पाकिस्तानचा संघ बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. त्यांनी असे केल्यास भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह असेल. २ ते १७ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणे अपेक्षित आहे.
Join Our WhatsApp Community