-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा अनेक अर्थांनी विसरण्यासारखा होता. मैदानावर संघाचा १-३ असा पराभव झाला. फलंदाज ढेपाळले तर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या महत्त्वाच्या फलंदाजांचा फॉर्म चुकीच्या कारणांसाठी चर्चिला गेला. अश्विनने दौऱ्याच्या मध्यावर निवृत्ती स्वीकारली. ड्रेसिंग रुममधील चर्चा बाहेर मीडियापर्यंत पोहोचल्या. आणि एकूणच चुकीच्या कारणांसाठी भारतीय संघाची चर्चा झाली. त्यानंतर बीसीसीआयलाही काही कडक पावलं उचलण्यावाचून पर्याय उरला नाही. खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळलंच पाहिजे हा पहिला फतवा बीसीसीआयने (BCCI) काढला. आणि परदेश दौऱ्याचे दहा कलमी नियम ठरवले. (BCCI Code of Conduct)
यात एक नियम आहे तो खेळाडूंनी स्वत:बरोबर किती वजन बाळगावं याविषयी. आणि फक्त खेळाडूंच्या वजनासाठीच बीसीसीआय पैशाची तरतूद करेल असंही नियमावलीत म्हटलंय. असा लेखी नियम करण्याची वेळ का आली हे आता स्पष्ट झालं आहे. एका स्टार खेळाडूने संबंध ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळून आपल्याबरोबर २५० किलोंचं वजन आणल्याचा उलगडा आता झाला आहे. भारतातून ऑस्ट्रेलियात, तिथे एका शहरातून दुसऱ्या शहरांत आणि मग पुन्हा भारतात असं हे वजन बीसीसीआयच्या खर्चाने वाहिलं जात होतं. (BCCI Code of Conduct)
(हेही वाचा – BMC : मुंबईतील झोपडपट्टयांमधील सामुहिक शौचालयांमध्ये महिलांसाठी ही सुविधा, बसवणार २ हजार मशिन्स)
या सामानांत एकूण २७ बॅगा होत्या. फक्त खेळाडूच्याच नाही तर दौऱ्यावर त्याच्या बरोबर आलेले कुटुंबीय आणि खाजगी कर्मचारी यांचंही सामान यात होतं. पण, खेळाडूव्यतिरिक्त इतर लोकांच्या सामानाचे पैसेही बीसीसीआयला (BCCI) द्यावे लागले. या सामानात या स्टार खेळाडूच्या १७ बॅटही होत्या. त्यामुळे हा खेळाडू फलंदाज असावा हे निश्चित आहे. (BCCI Code of Conduct)
या सगळ्यासाठी बीसीसीआयचे काही लाख रुपये खर्च झाले. त्यामुळे खेळाडूंचं सामान आणि वैयक्तिक कर्मचारी वर्ग यावरून आता बीसीसीआय (BCCI) जागरुक झाली आहे. इथून पुढे परदेश दौऱ्यावर फक्त १५० किलोंपर्यंतचं सामानच खेळाडू बरोबर बाळगू शकतील. यात क्रिकेट किटचाही समावेश असेल. आणि खेळाडूव्यतिरिक्त इतर लोकांचं अतिरिक्त सामान असेल तर ते पैसे खेळाडूला द्यावे लागतील, असा दंडक बीसीसीआयने केला आहे. (BCCI Code of Conduct)
दैनिक जागरण या वृत्तपत्राने ही बातमी पहिल्यांदा दिल्यावर त्यावरून खळबळ माजली आहे. या खेळाडूने संबंध ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपली पत्नी मुलांना दौऱ्यावर नेलं होतं. एका खेळाडूची सवय मग इतरांनाही लागते. त्यामुळे इतर खेळाडूही तसंच वागायला लागले. हॉटेलमधून मैदानापर्यंत जाण्यासाठी संघाच्या बसऐवजी खाजगी वाहनाची सोय करण्याचा आग्रह धरू लागले. त्यामुळे संघातील शिस्त बिघडत चालली असल्याचं लक्षात आल्यावर बीसीसीआयने ही १० कलमी आचारसंहिता बनवली आहे. (BCCI Code of Conduct)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community