-
ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली आहे. ६ जूनला फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेतील कुवेत विरुद्धचा सामना त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. छेत्रीने निवृत्तीचा विचार मनात घोळत असल्याचं सुतोवाच अलीकडेच केलं होतं. गुरुवारी त्याने आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हीडिओ शेअर केला. आणि निवृत्ती जाहीर करून टाकली. (Sunil Chhetri to Retire)
२००५ मध्ये पाकिस्तान विरुद्ध छेत्री आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आणि त्याच सामन्यात त्याने आपला पहिला गोलही झळकावला. त्यानंतर मागची १९ वर्षं त्याने भारतीय फुटबॉलची अव्याहत सेवा केली आहे.
I’d like to say something… pic.twitter.com/xwXbDi95WV
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 16, 2024
(हेही वाचा – IPL 2024, Playoff Scenerio : सनरायझर्स हैद्राबाद बाद फेरीत पोहोचणारा तिसरा संघ, आता चेन्नई, बंगळुरू आणि लखनौमध्ये स्पर्धा)
‘मी खूप दमलो होतो. किंवा माझ्या मनात काही भावना होती, असं अजिबात नाही. पण, मला जेव्हा वाटलं, की हा माझा शेवटचा सामना असावा, मी तो निर्णय घेऊन टाकला,’ असं सुनील छेत्री या व्हीडिओत सांगताना आपल्याला दिसतो. भारतासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर छेत्रीने मोलाची कामगिरी बजावली आहे. १५० सामन्यांत त्याच्या नावावर ९० गोल आहेत. आणि लायनेल मेस्सी (१०८ गोल) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो (१२३ गोल) हे दोनच खेळाडू छेत्रीच्या पुढे आहेत. इतकंच नाही तर भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा मानही छेत्रीलाच जातो. छेत्रीने निवृत्ती जाहीर केल्यावर लगेचच विराट कोहलीनेही (Virat Kohli) इन्स्टा स्टोरी शेअर करून छेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय फुटबॉल असोसिएशनने तब्बल सहावेळा छेत्रीचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून गौरव केला. २०११ मध्ये अर्जुन पुरस्कार तर २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात आलं. आपल्या १९ वर्षांच्या कारकीर्दीबद्दल ताज्या व्हीडिओत छेत्रीने भाष्य केलं आहे. ‘मी १९ वर्षांत कधीही एकट्याचा विचार केला नाही. मी एका संघासाठी खेळतोय ही भावना मनात ठेवली. आणि त्याचाच आनंद आणि अभिमान बाळगला. पण, गेली दोन वर्षं प्रत्येक सामना खेळताना काहीतरी विचित्र मनात येत होतं. हा सामना आपला शेवटचा आहे का, असं वाटत होतं. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली होती. तोच मी आता घेतलाय,’ असं व्हीडिओत छेत्री म्हणतोय. (Sunil Chhetri to Retire)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: पाकव्याप्त काश्मीर भारताचेच आहे, आम्ही ते घेऊ; अमित शहा यांनी कॉंग्रस नेत्यांवर साधला निशाणा)
#ThankYouSC11 💙#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/J5y4pew6Ee
— Indian Football Team (@IndianFootball) May 16, 2024
आंतरराष्ट्रीय स्तरावर छेत्रीने भारताला एएफसी चषक, नेहरु चषक आणि सॅफ चषक जिंकून देण्यात मोठं योगदान दिलं आहे. सध्या भारतीय संघ फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धा खेळत आहे. भारतीय संघाचा ए गटात समावेश असून कतारच्या खालोखाल भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कुवेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा पुढील सामना कुवेत विरुद्ध होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community