- ऋजुता लुकतुके
सिडनी कसोटीला शुक्रवारी सुरूवात झाली. पण, ज्या मालिकेची सुरुवात पर्थमधील विजयाने झाली, तिथे आता भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर पडला आहे आणि संघासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. मेलबर्न कसोटीतील पराभवाने आधीच्या वर्षाची सांगता खराब झाली आहे. आता नवीन वर्षी संघासमोर आव्हानं उभी आहेत. पण, भारतीय संघाच्या पिछेहाटीसाठी संघ आणि खेळाडूच जबाबदार आहेत.
संघ निवडीतील त्रुटी, स्टार खेळाडूंनी खराब फटके खेळून बाद होणं, बुमराहवर गोलंदाजीचा अतिरिक्त भार, रोहित शर्माचा कर्णधार म्हणूनही ढासळलेला फॉर्म अशा सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. यात आता नवीन भर पडली आहे ती ड्रेसिंग रुममध्ये गंभीर आणि खेळाडूंमध्ये झालेल्या चर्चेची. ड्रेसिंग रुममधील चर्चा फुटल्यामुळे संघात काही आलबेल नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. कुठल्याही क्रिकेट संघासाठी हे खरंतर नवीन नाही. पण, भारतीय संघासाठी अशावेळी घडतंय जेव्हा संघ स्थित्यंतरातून जातोय. (Sydney Test)
(हेही वाचा – National Sports Awards : मनु भाकरसह गुकेशलाही खेलरत्न, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर)
आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खुणावत आहे. मायदेशात न्यूझीलंड विरुद्धची मालिका ०-३ ने गमावल्यापासून भारतीय संघातील त्रुटी अचानक सगळ्यांसमोर आल्या आहेत. ती मालिका सुरू झाली तेव्हा भारत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपासून ३ सामने दूर होता. पण, आधी न्यूझीलंड विरुद्धचा पराभव आणि आता ऑस्ट्रेलियात २ कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघासाठी अंतिम फेरी कोसो दूर गेली आहे. अशावेळी सिडनी कसोटी जिंकून बोर्डर-गावस्कर चषक आपल्याकडे राखणे आणि अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीसाठी आव्हान जीवंत ठेवणं एवढंच भारतीय संघाच्या हातात आहे. त्यासाठी सिडनी कसोटीत आधीच्या चुका भारताला टाळाव्या लागणार आहेत.
अंतिम अकरा खेळाडूंविषयी स्पष्टता – सध्या भारतीय संघासाठी ही निवड नक्की कोण करतं आणि निवड झाल्यावर खेळाडूंना नीट कल्पना दिली जाते का हा प्रश्नच आहे. हर्षित राणाला संधी देण्याचा निर्णय, शुभमन गिलला वगळण्याचा निर्णय, सुंदरा संघात घेऊन गोलंदाजी ५० व्य षटकात देण्याचा निर्णय अशा अनेक तांत्रिक चुका भारताकडून झाल्या आहेत. पण, यातील सगळ्यात गंभीर आहे ती, संघात घेताना किंवा वगळताना खेळाडूंशी संवाद न साधण्याची. त्यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडल्याची चर्चा आहे. (Sydney Test)
(हेही वाचा – India and Pakistan यांच्यात अण्वस्त्रांच्या माहितीची देवाण घेवाण)
स्टार खेळाडूंचे खराब फटके – रोहित, विराट आणि रिषभने खराब फटके खेळून मेलबर्न कसोटी हरण्यात मदतच केली. रोहित आणि विराट तर अख्ख्या मालिकेत ठरलेला चुकीचा फटका खेळून बाद झाले आहेत. मेलबर्नमध्ये विराट आठव्या यष्टीवरील चेंडू खेळताना स्लिपमध्ये बाद झाला. तर रिषभ पंत जम बसलेला असताना आणि संघासाठी दोन तास खेळून काढणं गरजेचं असताना बाद झाला. खेळाडूंना संघाची रणनीती नीट कळवली जाते का आणि ते ती पाळत नसतील तर उपाययोजना काय असा हा प्रश्न आहे. सिडनीत हे टाळावंच लागेल.
बुमराहवर अतिरिक्त भार – भारतीय संघ सुरुवातीपासून या मालिकेत ५ गोलंदाज घेऊन खेळला आहे. शिवाय अष्टपैलू पर्याय भारताकडे आहेत. पण, तरीही बुमराह खेरिज एकही गोलंदाज प्रभावी ठरलेला नाही. बुमराहने एकट्याने ४ कसोटीत ३० बळी मिळवले आहेत. पण, त्याला इतरांची साथ मिळालेली नाही. त्यामुळे बुमराहवरील ताण वाढत आहे. मेलबर्न कसोटीत रोहितने बुमराहला ९ वेगवेगळ्या स्पेलमध्ये वापरलं. रोहितची असहाय्यता त्यातून दिसते. (Sydney Test)
(हेही वाचा – नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचे PM Narendra Modi यांच्याकडून कौतुक)
गंभीर आणि संघातील समन्वय – गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिकाही वादात सापडली आहे. तो आणि संघातील काही खेळाडू यांच्यात आवश्यक समन्वय नसल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर काही सहाय्यक प्रशिक्षक त्यांचे सहकारी घेऊन ऑस्ट्रेलियात आल्याचं बोललं जातंय. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांसाठी राखीव जागेवर त्यांना बसवलं जातंय. आणि ही गोष्ट बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनाही आवडलेली नाही.
रोहितच्या तांत्रिक चुका – फलंदाज म्हणून रोहित अपयशी ठरतोच आहे. त्याचवेळी कर्णधार म्हणूनही त्याच्याकडून तांत्रिक चुका झाल्या आहेत. ब्रिस्बेन कसोटीत पहिली गोलंदाजी घेणं, स्वत:चा फलंदाजीचा क्रम न ठरवू शकणं, गोलंदाजीत बदल करताना कल्पकतेचा अभाव आणि बुमराहवर अति विसंबून राहणं यासाठी रोहितच जबाबदार आहे. आता भारतीय संघाला नवीन वर्षाचा प्रवास सुरू करताना या चुका टाळाव्या लागणार आहेत. (Sydney Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community