सध्या टी-20 विश्वचषकाचा थरार चांगलाच रंगला आहे. ग्रुप लेव्हलचे सामने संपून लवकरच सेमी फायनल आणि फायनल्सच्या खेळातील चुरस पहायला मिळणार आहे. पण या विश्वचषकात पाऊस हा अनेक संघांसाठी डोकेदुखी ठरला आहे. अनेक संघांना पावसाच्या व्यत्ययामुळे पराभवाचा देखील सामना करावा लागला आहे. पण आता याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(ICC)ने मोठा निर्णय घेतला आहे.
सेमी फायनल आणि फायनल्सच्या नियमांमध्ये आयसीसीने मोठा बदल केला आहे. या सामन्यांत पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणामुळे व्यत्यय आला तर दोन्ही संघांनी प्रत्येकी किमान 10 षटके खेळल्यावरच डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल जाहीर होईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा कर्णधार, न्यूझीलंड दौ-यासाठी यांच्यावर कर्णधारपदाची धुरा)
मर्यादेत वाढ
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या सध्याच्या नियमानुसार, दोन्ही संघांनी प्रत्येकी किमान 5-5 षटके खेळली असतील तर डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्यात व्यत्यय आल्यावर निर्णय दिला जातो. पण आता 5 षटकांची ही मर्यादा वाढवून प्रत्येकी 10 षटके अशी करण्यात आली आहे.
सेमी फायनलमध्ये पाऊस आला तर विजयी कोण?
टी-20 विश्वचषकात यंदा सेमी फायनल आणि फायनलच्या सामन्यांसाठी राखीव दिवस देखील ठेवण्यात आले आहेत. सेमी फायनलच्या सामन्यात जर का पावसामुळे व्यत्यय आला आणि प्रत्येकी 10 षटकांचाही सामना होऊ शकला नाही तर सामना राखीव दिवशी खेळवण्यात येईल. जर राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही तर ग्रुप स्टेजमध्ये टेबल टॉपर असलेला संघ विजयी म्हणून घोषित केला जाईल आणि त्या संघाला फायनलमध्ये प्रवेश देण्यात येईल.
(हेही वाचाः भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय, खेळाडूंच्या मानधनाबाबत बीसीसीआयची मोठी घोषणा)
…तर दोन्ही संघ विश्वविजेते
समजा, विश्वचषकाच्या फायनलमध्येही जर का पावसामुळे आडकाठी आली तर फायनलमध्ये खेळणा-या दोन्ही संघांना टी-20 विश्वविजेते म्हणून घोषित करण्यात येईल. टी-20 विश्वचषकाची पहिली सेमी फायनल 9 नोव्हेंबर,तर दुसरी सेमी फायनल 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर 13 नोव्हेंबरला टी-20 विश्वचषकाचा जंगी सामना रंगणार आहे.
Join Our WhatsApp Community