T-20 World Cup: भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय! भारत-पाकिस्तानमध्ये अंतिम सामना रंगण्याची शक्यता

180

टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला आहे. या सामन्याआधीच भारताने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण झिम्बाब्वेवरील विजयामुळे भारताने ग्रुप लेव्हलवरील सामन्यांत सर्वाधिक 8 गुण पटकावत टेबल टॉपर होण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे आता उपांत्य पूर्व फेरीत टीम इंडियाची झुंज ही इंग्लंडसोबत होणार आहे.

भारताने रविवारी झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि के एल राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर झिम्बाब्वेला 187 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची पुरती ससेहोलपट झाली. झिम्बाव्वेला टीम इंडियाने 17.2 षटकांत केवळ 115 धावांवर गुंडाळले आणि विजय आपल्या खिशात घातला.

सूर्याची चमकदार खेळी

या सामन्यात सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. सूर्यकुमारने अवघ्या 25 चेंडूत 61 धावा ठोकल्या आणि झिम्बाब्वेची दाणादाण उडवली. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून आर अश्विन,भुवनेश्वर कुमार,अर्शदीप सिंह,मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या यांनी अचूक गोलंदाजी करत झिम्बाब्वेला जेरीस आणले.

भारत नंबर-1, पाकिस्तान दुस-या स्थानी

रविवारी नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला टी-20 विश्वचषकातून आपला गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे रविवारी होणा-या सामन्याआधीच 6 गुणांसह आघाडीवर असलेला भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. पाकिस्ताननेही रविवारी बांग्लादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तान 6 गुण मिळवत गुणतालिकेत भारतापाठोपाठ दुस-या स्थानी आहे.

(हेही वाचाः T-20 World Cup मध्ये नवा ट्विस्ट, ICC ने बदलले सेमी फायनल आणि फायनलसाठीचे नियम)

…तर भारत-पाकिस्तानमध्ये होणार अंतिम लढत

त्यामुळे आता 9 नोव्हेंबर रोजी होणा-या पहिल्या उपांत्या फेरीत पाकिस्तानचा सामना हा ग्रुप-1 मधील टेबल टॉपर असलेल्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि ग्रुप-1 मधील दुस-या स्थानी असलेल्या इंग्लंडमध्ये उपांत्या फेरीची लढत होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये जर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ विजयी झाले तर टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तान हे आमने-सामने असणार आहेत. 13 नोव्हेंबर रोजी विश्वचषकातील अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.