T-20 World Cup: भारतीय संघात अंतिम ११मध्ये कुणाला संधी मिळणार?

127
T-20 World Cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेचे फलंदाजी आणि गोलंदाजीचे विक्रम, कोण ठरलंय टी-२० मध्ये सरस?

टी-२० विश्वचषकात भारतीय संघ उतरतोय तो एका संमिश्र भावनेनं. नोव्हेंबर २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव अजून संघातील काही लोक विसरलेले नाहीत. खासकरून रोहीत शर्मा, विराट कोहली हे ज्येष्ठ खेळाडू कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आयसीसी विजेतेपदाची आस मनात बाळगून होते. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही विश्वचषकाची ही भेट घेऊनच आपलं पद सोडायचं होतं. पण, तसं घडलं नाही. बीसीसीआयने या खेळाडूंचा अनुभव आणि त्यांच्या मनातील इच्छेचा मान ठेवून त्यांना आयसीसी चषक उंचावण्याची आणखी एक संधी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात खेळलेले तब्बल ९ खेळाडू पंधरा जणांच्या या संघातही आहेत. (T-20 World Cup)

पण, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-२० हे दोन स्वतंत्र प्रकार आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्ही खेळीला आकार देऊ शकता. इथं झटपट आणि जास्तीत जास्त धावा हा एकच मंत्र आहे. अशावेळी हे ज्येष्ठ खेळाडू २० षटकांच्या स्पर्धेचं आव्हान कसं पेलतात यावरही सगळ्यांचं लक्ष असणार आहे. हे लक्षात घेऊन निवड समितीने संघात युवा आणि ज्येष्ठ खेळाडूंचा मिलाफ कसा असेल याचाही प्रयत्न केला आहे. शिवम दुबे, संजू सॅमसन यांचाही संघात समावेश झाला आहे. (T-20 World Cup)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुंबईत ५,८३६ वाहनांची झाडाझडती )

अमेरिकन आणि विंडिज खेळपट्ट्या धिम्या असतील असं गृहित धरुन ४ फिरकीपटूंचा समावेश संघात झाला आहे. हे सगळं पाहता भारताचे अंतिम ११ खेळाडू कोण असतील याचा थोडासा अंदाज घेऊया.

आयपीएलमधील विराटची पॉवरप्ले म्हणजे पहिल्या ६ षटकांतील कामगिरी पाहता, तोच सलामीसाठीचा योग्य पर्याय असेल. पण, मग त्याच्याबरोबर नियमित सलामीवीर रोहीत शर्माला पाठवायचं की, यशस्वी जयसवालला याचा निर्णय संघ प्रशासनाला घ्यावा लागेल. डावी-उजवी जोडी पाठवण्यासाठी यशस्वी सलामीला जाऊ शकतो आणि मग रोहीतला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल.

चौथ्या क्रमांकावर सुर्यकुमार यादवला पर्याय नाही. तो भारताचा टी-२० मधील सर्वोत्तम फलंदाज आहे. तर पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्याला संधी मिळू शकते. संघात अष्टपैलू फिरकीपटूंना संधी द्यायची झाली तर तेज गोलंदाजीचा पर्याय म्हणूनही हार्दिकवर मदार असेल. सहाव्या क्रमांकावर रिषभ पंतला त्याच्या गत कामगिरीच्या जोरावर स्थान मिळू शकतं. सातव्या क्रमांकावर अष्टपैलू रवींद्र जाडेजा, आठव्या क्रमांकावर अक्षर पटेल, नवव्या क्रमांकावर कुलदीप यादव, दहाव्या क्रमांकावर जसप्रीत बुमरा आणि अकराव्या क्रमांकावर महम्मद सिराज असेल.

अशा पद्धतीने भारतीय संघात पहिले चार निव्वळ फलंदाज, एक अष्टपैलू तेज गोलंदाज, दोन अष्टपैलू फिरकीपटू, यष्टीरक्षक फलंदाज आणि दोन तेज गोलंदाज तर एक निव्वळ फिरकीपटू यांचा समावेश होऊ शकतो.

यात भारतीय संघासाठी आणखी एक पर्याय असू शकतो. शिवम दुबे या युवा डावखुऱ्या फलंदाजाने आयपीएलमध्ये घणाघाती फलंदाजीने चमक दाखवली आहे. तर यशस्वी जयसवाल आयपीएलमध्ये अजिबात फॉर्ममध्ये नव्हता. हे पाहता, सलामीला विराट आणि रोहीत ही अनुभवी जोडी पाठवल्यानंतर सुर्यकुमारला तिसऱ्या क्रमांकावर पाठवता येईल आणि चौथ्या क्रमांकावर शिवम दुबेलाही संधी मिळू शकते.

यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतबरोबरच संजू सॅमसनचाही विचार होऊ शकतो. या शक्यता लक्षात घेऊन भारताचा बारा जणांचा अंतिम संघ काय असेल याचा अंदाज बघूया,

अकरा जणांचा भारतीय संघ – यशस्वी जयसवाल, विराट कोहली, रोहीत शर्मा, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, पिषभ पंत, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा व महम्मद सिराज. बारावा खेळाडू – शिवम दुबे

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.