सध्या टी-20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघ हा उंपात्य फेरीची स्वप्न पाहत असतानाच संघातील काही खेळाडूंच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज के एल राहुलवर सातत्याने टीका होताना दिसत आहे. विश्वचषकातील तिन्ही सामन्यांमध्ये राहुलला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे राहुलला पुढील सामन्यांसाठी वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. के एल राहुलकडून पुढील सामन्यांत नक्कीच दमदार खेळी खेळण्यात येईल, असा विश्वास राहुल द्रविड यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाला द्रविड?
के एल राहुल हा एक हरहुन्नरी आणि उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याची फलंदाजी उत्तम आहे हे आपण सगळ्यांनीच पाहिले आहे. पण टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजाचा फॉर्म जाणं हे ब-याचदा घडते. राहुलने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अशीच खेळी त्याच्याकडून पुढील सामन्यांत होईल, असे टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील विश्वचषक हा खूपच आव्हानात्मक आहे. इथल्या खेळपट्ट्यांवर खेळण्यासाठी के एल राहुल सारखाच फलंदाज महत्वाचा आहे, असेही द्रविडने अधोरेखित केले आहे.
(हेही वाचाः ई-लर्निंग प्लॅटफॉर्म Byju’s मधून अडीच हजार कर्मचा-यांना काढून टाकणार! सीईओने मागितली माफी, म्हणाले…)
राहुलवर पूर्ण विश्वास
आम्ही आमच्या खेळाडूंशी नेहमीच चर्चा करत असतो आणि त्यांच्या चांगल्या खेळासाठी त्यांना मार्गदर्शन देखील करत असतो. त्यामुळे के एल राहुलवर संघ प्रशासनाचा आणि संघाचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्याचा खराब फॉर्म हा आमच्या चिंतेचा विषयच नसल्याचे राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Join Our WhatsApp Community