
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७,००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने ४३ शतके आणि ९१ अर्धशतकेही केली आहेत. त्याची फलंदाजीची सरासरीही ४२ पेक्षा जास्त आहे.
दरम्यान रोहितने कसोटीत ३ हजार ३७९ धावा, एकदिवसीय सामन्यात ९ हजार ७८२ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी- 20 मध्ये ३ हजार ८५३ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी ४५.८० आहे. त्याचबरोबर त्याने वनडेमध्ये ४८.९१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. टी- 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजीची सरासरी ३१.३२ इतकी आहे.
( हेही वाचा: पाच हक्कभंग प्रस्ताव आले; पण निर्णय घेण्यासाठी विधानपरिषदेत हक्कभंग समितीच नाही! )
‘हे’ आहेत आधीचे सहा भारतीय फलंदाज
भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यात १७ हजारहून अधिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या आधी सहा भारतीय फलंदाजांनी केला आहे. यात पहिल्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ७८२ डावांमध्ये ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. त्या खालोखाल विराट कोहली असून त्याने ४९३ सामन्यांच्या ५५१ डावांमध्ये २५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविडने २४,२०८ धावा केल्या आहेत. माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत चौथ्या क्रमांकावर असून १८,५७५ धावा, पाचव्या क्रमांकावर सर्वांत यशस्वी कर्णधार एमएस धोनीने १७,२६६ धावा, माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावावर १७,२५३ धावा केल्या आहेत. त्यानंतर सातव्या क्रमांकावर भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने १७,०१४ धावा केल्या आहेत.