भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिका दौ-यावर रवाना होणार आहे. क्रिकेटप्रेमींना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका थरार पहायला मिळणार आहे. 16 डिसेंबरपासून सुरु होणा-या या दौ-यात पहिले तीन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माला उपकर्णधारपद आणि वनडे सामन्यांसाठी रोहितकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण, बीसीसीआयच्या या निर्णयानंतर भारतीय संघात वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआय धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारताच्या कर्णधार पदी विराट वा रोहितला न ठेवता नव्या खेळाडूच्या नावाची कर्णधार पदी वर्णी लागू शकते.
विराट विरुद्ध रोहित
रोहित शर्मा याच्याकडे वनडे संघाचे नेतृत्व दिल्याने विराट कोहली खुश नसल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे. विराटने स्वेच्छेने टी 20 संघाचे नेतृत्व सोडले होते. मात्र, वनडे व कसोटी संघाचे नेतृत्व तो करत होता. परंतु, बीसीसीआयने अचानक रोहितला वनडे संघाचे कर्णधारपद दिले. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये विराट विरुद्ध रोहित असा अप्रत्यक्ष वाद सुरू झालेला दिसतो. त्यातच दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तोंडावर रोहितला दुखापत झाल्याने तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तर, विराटही आपल्या मुलीचा वाढदिवस असल्याने हा कसोटी सामना खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
‘हा’ असणार नवा कर्णधार
रोहित आणि विराट यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बीसीसीआय एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर काही दिवसात तोडगा न निघाल्यास बीसीसीआय के एल राहुल याच्याकडे तिन्ही प्रकारच्या संघांचे नेतृत्व देऊ शकते. राहुल सध्या ३० वर्षाचा आहे. त्यामुळे पुढील पाच-सहा वर्ष तो संघाची धुरा वाहू शकतो. दुसरीकडे, विराट ३३ व रोहित ३४ वर्षांचा असल्याने वय त्यांच्या विरोधात जात आहे. त्याचबरोबर बीसीसीआय तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी तीन वेगळे कर्णधार नेमू शकते. यामध्ये राहुलकडे कसोटी, श्रेयस अय्यर याच्याकडे वनडे व रिषभ पंतकडे टी२० संघाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा: विदेश प्रवास केलेल्या व्यक्तिसह सात जण ओमायक्रॉनच्या विळख्यात! )
Join Our WhatsApp Community